वैजापूर : वैजापूर तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींमध्ये तब्बल ३४ लाख १९ हजार ९१५ रुपयांच्या घोटाळ्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी मंगळवारी माहिती देताना सांगितले की, या प्रकरणात आठ ग्रामसेवकांना निलंबित करण्यात आले आहे. चौकशीअंती १३ सरपंचांवरही कारवाई केली जाणार आहे.
१७ जुलै रोजी वैजापूर पंचायत समितीच्या बैठकीदरम्यान हा मोठा घोटाळा समोर आला होता. ग्रामपंचायतींकडून संगणक परिचालकांना देण्यात येणाऱ्या मानधनात लाखोंचा गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्या वेळी प्रशासनाने केवळ एका ऑपरेटरवर कारवाई केली होती; मात्र मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी सांगितले की, जेवढा दोष ऑपरेटरवर आहे, तेवढा दोष सरपंच आणि ग्रामसेवकांनाही आहे.
पुढारीने सातत्याने या घोटाळ्याचा पाठपुरावा केल्यानंतरच प्रशासनाने कारवाईचा मार्ग मोकळा केला. नागरिकांचा दबाव आणि सातत्याने होणाऱ्या टीकेच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई झाली असल्याचे अधिकारी म्हणतात.
ग्रामपंचायतीनुसार अपहाराची रक्कम:
चोरवाघलगाव – ५,२४,८८८
मनेगाव – १,९१,२२२
आंचलगाव – ७४,८८१
सटाणा – ४,०६,४४१
हाजीपूरवाडी – ४,८८,६९४
रघुनाथपुरवाडी – २,९४,०२४
वडजी – १,८३,७५४
अव्वलगाव – १,४१,०००
भग्गाव – १,५६,५८०
बेलगाव – २,१०,६१५
खरज – ३,८६,५०४
भिवगाव – २,१२,३४०
तलवाडा – १,४८,९७२
तालुक्यात राहून इतर ग्रामसेवकांना मार्गदर्शन करणाऱ्या एका ग्रामसेवकामुळे जिल्ह्यात घोटाळा पसरल्याची चर्चा आहे. त्यामुळे वैजापूरात आठ ग्रामसेवक निलंबित झाले, तसेच जिल्हाभर हा घोटाळा उघडकीस येऊन अनेक ग्रामसेवक निलंबित होण्याची शक्यता आहे.
घोटाळा उघडकीस येताच ऑपरेटरवर तातडीने वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला, परंतु ग्रामसेवकांवर गुन्हा दाखल करण्यास तब्बल दोन महिने विलंब झाला. नागरिकांचा संताप वाढत असून सरपंच–ग्रामसेवकांवर गुन्हा दाखल होण्याच्या वेळेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आठ ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई झाली असून १३ सरपंचांवरही कारवाई प्रस्तावित आहे. तसेच दप्तर तपासणी आणि विभागीय चौकशीत आलेल्या आरोपांनंतर त्यांच्यावर योग्य कारवाई करण्यात येणार आहे.