Sattar vs. Shirsat controversy flares up again after two years
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : पालकमंत्री संजय शिरसाट आणि आमदार अब्दुल सत्तार यांच्यातील अंतर्गत वाद पुन्हा एकदा पेटला आहे. अलीकडच्या काळात जिल्ह्यावरील शिवसेनेची पकड सैल होत चालली आहे. निधी वाटपात भेदभाव होत आहे. सिल्लोड-सोयगाव मतदारसंघाला विकास निधीपासून वंचित ठेवले जात आहे, अशा शब्दांत सत्तार यांनी शिरसाटांविषयीची खदखद बाहेर काढली.
पालकमंत्री अब्दुल सत्तार
शिवसेनेचे नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत सिल्लोड येथे शुक्रवारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यात बोलताना आमदार सत्तार यांनी यापुढेही अशाच पद्धतीने कारभार सुरू राहिला तर पक्षाला भविष्यात फटका बसेल, असा इशाराही दिला. सत्तार म्हणाले, आधी संपूर्ण जिल्ह्यावर शिवसेनेचे वर्चस्व होते, परंतु आता ही पकड सैल होत आहे.
गेल्या काळात छत्रपती संभाजीनगर महापालिका गेली, जिल्हा परिषद गेली, आता जिल्हा बँक घालविण्याची तयारी सुरू आहे. आम्ही इथे सिल्लोडमध्ये पक्ष मजबूत करत आहोत. सिल्लोडमध्ये ३१ पैकी २८ नगरसेवक जिंकून आणले, पण आम्हाला २८ रुपयेही निधी मिळाला नाही. सिल्लोड-सोयगाव मतदारसंघाला सावत्रपेक्षाही वाईट वागणूक मिळत आहे. वरिष्ठांनी लक्ष द्यावे. विकास निधी मिळत नसेल तर पक्षाला फटका बसेल. पक्ष संकटात येईल. या गोष्टींचा व्यवस्थित अभ्यास करा, विचार करा आणि चर्चा करा, असे सत्तार म्हणाले.
डीपीसीचा निधी गुपचूप दिला जात नाही : शिरसाट
आमदार अब्दुल सत्तार यांनी केलेले आरोप पालकमंत्री संजय शिरसाट यांनी रविवारी (दि. २४) खोडून काढले. ते म्हणाले, सत्तार यांनी काय तक्रार केली हे मी ऐकले नाही किंवा वाचले नाही. परंतु जिल्हा नियोजन समितीचा निधी काही गुपचूप दिला जात नाही. कुणाला किती निधी दिला याचे सर्व रेकॉर्ड कलेक्टर ऑफिसमध्ये असते. बैठकीत चर्चा करून निधीचे नियोजन होते. तरीही सत्तार यांना काही तक्रार असेल तर त्यांनी माझ्याकडे यावे. माझ्याशी चर्चा करावी. मी त्याबद्दलचे स्पष्टीकरण देईल, असे पालकमंत्री संजय शिरसाट म्हणाले.
याआधीही एकमेकांना दिले होते आव्हान
मंत्री शिरसाट आणि आमदार सत्तार यांच्यात दोन वर्षांपूर्वीही अंतर्गत संघर्ष उफाळून आला होता. विधानसभा निवडणुकीनंतर पालकमंत्रिपदी संजय शिरसाट यांची वर्णी लागली. त्याआधी सत्तार हे जिल्ह्याचे पालकमंत्री होते. पालकमंत्रिपद आल्यावर शिरसाट यांनी सत्तारांविरोधात रान उठवत त्यांना उघड आव्हान दिले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून सत्तार यांनीही मग छत्रपती संभाजीनगरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर शक्तिप्रदर्शन करत कुणी कितीही वर्षे पालकमंत्री राहिले तरी मला फरक पडत नाही, मी कच्चा खेळाडू नाही, असे प्रतिआव्हान दिले. मात्र नंतरच्या काळात पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्तीने हा वाद काहीसा शमला होता.