छत्रपती संभाजीनगर : सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी अखेर छत्रपती संभाजीनगरातील 64 कोटींच्या विटस् हॉटेलच्या खरेदी प्रक्रियेतून माघार घेत असल्याचे जाहीर केले. विरोधकांच्या आरोपांमुळे उद्विग्न झालेल्या संजय शिरसाट यांनी माझ्याकडेही सर्वांच्या स्टोर्या आहेत, ज्या दिवशी मी त्या बाहेर काढायला सुरुवात करेन, त्या दिवशी मी घराला आग लावायलाही कमी करणार नाही. एवढा मी चक्रम आहे, असे बोलताना त्यांचा संयमाचा बांध फुटला .
जिल्हा प्रशासनाने 20 मे रोजी धनदा कॉर्पोरेशनच्या मालकीच्या दोन मालमत्तांचा लिलाव केला आहे. लिलावासाठी 64 कोटी 53 लाख रुपयांची प्रारंभिक किंमत ठेवली होती. सिद्धांत मटेरियल प्रोक्युअरमेंट अँड सप्लायईज कंपनीने या मालमत्तांसाठी 64 कोटी 83 लाखांची सर्वोच्च बोली लावून हा लिलाव जिंकला होता. मात्र, या कंपनीत सामाजिक न्यायमंत्री शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत हे पार्टनर असल्याने विरोधी पक्षाने त्यावरून गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते.
ही मालमत्ता प्रत्यक्षात दीडशे कोटींहून जास्त किमतीची असून केवळ मंत्री शिरसाट यांच्यासाठी प्रशासनाने त्याची किंमत कमी दाखवून लिलाव केला, असा आरोप शिवसेना उबाठा पक्षाचे नेते खा. संजय राऊत आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला होता. तसेच या लिलाव प्रक्रियेची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणीही मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली होती. या खरेदीवरून मंत्री शिरसाट यांच्यावर टीकेची चौफेर झोड उठली होती. त्यानंतर पाचच दिवसांत मंत्री शिरसाट यांनी या खरेदी प्रक्रियेतून मुलगा सिद्धांत माघार घेणार असल्याचे जाहीर केले. टेंडर प्रक्रियेतून बाहेर पडत असल्याचे पत्र मुलगा उद्याच प्रशासनाला देईल, असेही त्यांनी सांगितले.
लिलाव प्रक्रियेत कुठेही भ्रष्टाचार झाला नव्हता. तरीही माझी राजकीय कारकीर्द डागाळण्याचा प्रयत्न झाला. कुटुंबावर वार करून माझी इमेज डागाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. यापुढे जर तुम्ही वैयक्तिक आरोप करायचे सुरू ठेवले तर मलासुद्धा सर्व माहिती आहे. तुमच्या स्टोर्या माहिती आहेत. ज्या दिवशी मी त्या काढायला सुरुवात करेन, त्या दिवशी मी संजय शिरसाट आहे, घराला आग लावायला कमी करणार नाही, असा इशारा शिरसाट यांनी विरोधकांना दिला.