आयुष्यात शांतताही महत्वाची, सत्तारांपाठोपाठ संजय शिरसाट यांचे राजकीय निवृत्तीचे संकेत (file photo)
छत्रपती संभाजीनगर

आयुष्यात शांतताही महत्वाची, सत्तारांपाठोपाठ संजय शिरसाट यांचे राजकीय निवृत्तीचे संकेत

जनतेने भरभरून प्रेम दिले, पण आता थांबले पाहिजे

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा

राजकीय जीवनात आतापर्यंत जनतेने मला भरपूर प्रेम दिले. त्या जोरावरच मला आमदारकीचा चौकार मारता आला. आता निवडणूक जिंकण मला अवघड राहिल नाही. परंतु कुठे तरी थांबल पाहिजे. आयुष्यात शांतताही महत्वाची असते. आता एवढे पाच वर्ष राजकारण राहू द्या, असे म्हणत पालकमंत्री संजय शिरसाट यांनी रविवारी आपल्या राजकीय निवृत्तीचे संकेत दिले.

काही दिवसांपूर्वीच सिल्लोडचे आमदार अब्दूल सत्तार यांनी यापुढे सिल्लोड विधानसभा लढविणार नसल्याचे जाहीर केले होते. त्यापाठोपाठ संजय शिरसाट यांनीही रविवारी आपल्या राजकीय निवृत्तीचे संकेत दिले. त्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्यावतीने रविवारी रात्री विजय चौकात पालकमंत्री संजय शिरसाट आणि मंत्री अतूल सावे यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर माजी महापौर नंदकुमार घोडेले, विकास जैन, शिल्पाराणी वाडकर आदींची उपस्थितीती होती.

नगरसेवक झालो, नंतर आमदार बनलो. दुसऱ्यांदा आमदार, तिसऱ्यांदा आमदार आणि आता चौथ्यांदा आमदार झालो. मंत्री आणि पालकमंत्रीही बनलो. इतक्यावेळा आमदार होणे सोपे नाही. पहिल्या निवडणुकीतच माझी दमछाक झाली होती. परंतु प्रत्येक निवडणुकीत माणसं जोडत गेलो. कुणाविषयीही मनात द्वेषभाव ठेवला नाही. त्यामुळे जनतेनेही मला भरभरुन प्रेम दिले. जनतेच्या प्रेमामुळेच चौथ्यांदा विजयी झालो. आता पाचव्यांदा, सहाव्यांदा निवडणूक जिंकणे अवघड नाही. मात्र, कुठे तरी थांबले पाहिजे. मी महाराजांप्रमाणेच भाषण देण्यात पटाईत झालो आहे. त्यामुळे निवृत्तीनंतर कदाचित महाराज होईल. लोक पायाही पडतात, तोपर्यंत पाच वर्ष तेवढे राजकारणात राहू द्या, आतापर्यंतच्या आयुष्यात स्वाभिमानाने लढलो, यापुढेही स्वाभीमानाने जगेल, असेही शिरसाट म्हणाले.

माझा ७२ वा मजला सर्वांना माहितीय

माझं सगळ उघड असत. मुंबईतला माझा ७२ वा मजलाही सगळ्यांना माहिती आहे की नाही ? तुमच्या घरचे लोक काम का करतात ? चांगल घर बांधता यावं, बायकोला दागिणे घेता यावेत, गाडी घेता यावी म्हणूनच ना ? मीही माझ्या बायकोसाठी बंगला बांधला, मग काय गैर केले. काही जण म्हणतात हे बरोबर नाही. लोकांच्या डोळ्यात येते. पण मी म्हणतो आग लागू द्या त्यांच्या डोळ्यांना. अरे आयुष्यच किती आहे, एवढी काळजी कशाला करायची. सगळ करा, फक्त लोकांचे तळतळाट घेऊ नका, असे संजय शिरसाट म्हणाले.

जूनपर्यंत नियमित पाणी देऊ - सावे

राजेंद्र जंजाळ यांनी दोन्ही मंत्र्यांना उद्देशून शहराला नियमित पाणीपुरवठा करण्याची मागणी केली. त्या अनुषंगाने मंत्री अतूल सावे म्हणाले की, मी पाणी योजनेच्या कामाबाबत सतत बैठका घेत आहे, मुख्यमंत्रीही योजनेच्या कामावर लक्ष ठेवून आहेत. परंतु खरं सांगेल, मार्चपर्यंत शक्य नाही, मात्र जूनपर्यंत शहराला नियमित पाणीपुरवठा होऊ शकेल, त्याआधी कदाचित एक टप्पा कमी होईल, असेही सावे यांनी सांगितले. तर शिरसाट यांनी जूनपर्यंत नाही तर एप्रिलपर्यंतच नियमित पाणीपुरवठा करु. न झाल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई करु, असा इशारा दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT