Sand theft from seized sand deposit, village revenue officers were beaten up by the accused
तळणी, पुढारी वृत्तसेवा : मंठा तालुक्यातील टाकळखोपा येथे महसूल विभागाने जप्त केलेल्या अवैध वाळू साठ्यातून आरोपींनी वाळूची चोरी केल्याचा आणि कारवाई रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या ग्राम महसूल अधिकाऱ्यांला धक्काबुक्की केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मंठा पोलिस ठाण्यात शासकीय कामात अडथळा, चोरी तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे महसूल विभागातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
टाकळखोपा येथील गायरान जमिनीवर महसूल प्रशासनाने २ जून रोजी सुमारे १२५ ब्रास अवैध वाळू साठा जप्त केला होता. या जप्त साठ्याची पाहणी व देखरेख करण्यासाठी ग्राम महसूल अधिकारी विष्णू भवाळ हे ३ जून रोजी सकाळी घटनास्थळी गेले असता तेथे भानुदास अंबादास सातपुते (रा. टाकळखोपा) यांच्या जेसीबीने टिप्पर क्रमांक (एमएच २१ बीएच ९७०६) मध्ये जप्त वाळू साठ्यातील वाळू भरली जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
घटनास्थळी गेले असता तेथे भानुदास अंबादास सातपुते (रा. टाकळखोपा) यांच्या जेसीबीने टिप्पर क्रमांक (एमएच २१ बीएच ९७०६) मध्ये जप्त वाळू साठ्यातील वाळू भरली जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
ग्राम महसूल अधिकारी घटनास्थळी पोहोचल्याचे लक्षात येताच जेसीबी चालक तेथून निघून गेला. मात्र काही वेळानंतर संबंधित व्यक्ती पुन्हा घटनास्थळी आला. ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी वाळूने भरलेला टिपर रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांना बाजूला ओढून धक्काबुक्की करण्यात आली. यानंतर टिप्परचालक वाहनासह तेथून निघून गेला. जप्त करण्यात आलेल्या वाळू साठ्यातील अंदाजे ३५ ते ४० ब्रास वाळू चोरी करून नेण्यात आली. घटनेची माहिती स्थानिक पोलिस पाटील यांना देण्यात आली असून त्यानंतर पोलिसांकडे अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली.
याप्रकरणी ग्राम महसूल अधिकारी विष्णू भवाळ यांच्या फिर्यादीवरून मंठा पोलिसांनी जेसीबी चालक भानुदास अंबादास सातपुते (रा. टाकळखोपा) तसेच टिपर टिप्परधारकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक नीलेश इधाटे हे करीत आहेत. तळणी परिसरातील पूर्णा नदीच्या पात्रातून सासखेडा, किर्ला, पोखरी, केंधळे, देवठाणा, उस्वद, खोरवड, लिंबखेडा, भुवन, दुधा, कानडी या गावाच्या हद्दीतून दररोज शेकडो ब्रास वाळू चोरीला जात आहे. खुलेआम उपसा होत असून अवैध साठे होत असताना स्थानिक महसूल यंत्रणा गप्प का? असा प्रश्न आहे.
महसूल व पोलिसांसमोर आव्हान
जप्त केलेल्या शासकीय ताब्यातील वाळू साठ्यावरच चोरी झाल्याने महसूल व पोलीस प्रशासनासमोर आव्हान निर्माण झाले आहे. या प्रकरणातील सर्व संबंधित बाबींचा तपास पोलीस करत असून, चोरी गेलेल्या वाळूचा मागोवा घेणे, फरार चालकाचा शोध घेणे आणि घटनेतील इतर संबंधितांची भूमिका तपासणे यावर भर दिला जात आहे.