Samruddhi Highway Robbery Case: गुटखा माफिया शेंडगेसह चौघांच्या आवळल्या मुसक्या file photo
छत्रपती संभाजीनगर

Samruddhi Highway Robbery Case: गुटखा माफिया शेंडगेसह चौघांच्या आवळल्या मुसक्या

वाळूचा हायवा चालवायचाय, एका ट्रिपचे १० हजार मिळतील आमिष दाखवून आरोपीला उचलले

पुढारी वृत्तसेवा

Samruddhi Highway robbery case: Four arrested, including Gutkha mafia don Shendge

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : समृद्धी महामार्गावर हडसपिंपळगावजवळ (वैजापूर) वाहनचालकाला अडवून लुटमार केल्याप्रकरणी फरार असलेल्या उर्वरित ४ दरोडेखोरांच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेला (एलसीबी) यश आले आहे. रस्ते ठेकेदार असल्याचे भासवून, चांगल्या पगारावर ड्रायव्हर हवा आहे असे आमिष दाखवत पोलिसांनी बीड जिल्ह्यात वेषांतर करून एका आरोपीला पानटपरीवर पकडले. तर, याच टोळीतील आणि 'एफडीए'च्या पथकावर गाडी घालून फरार झालेला सराईत गुटखा माफिया सुनील शेंडगे याला तिसगाव येथून अटक करण्यात आली.

ओमकार रामचंद्र फसले (२२, रा. म्हाळस जवळा, जि. बीड), भिमराव ऊर्फ शहादेव भगवान तांदळे (२६, रा. एकनाथवाडी, ता. पाथर्डी), सुनील गणपत चव्हाण (२२, रा. दामुनाईक तांडा, ता. गेवराई) आणि सुनील कल्याण शेंडगे (२६, ह.मु. रांजणगाव शेणपुंजी) अशी नव्याने अटक करण्यात आलेल्या चार आरोपींची नावे आहेत. या दरोडा प्रकरणात आतापर्यंत एकूण ११ आरोपींना अटक केली आहे.

२६ ऑगस्ट रोजी समृद्धी महामार्गावर एक्झिट क्रमांक १८ जवळ दरोडा पडला होता. यातील ७ आरोपींना ग्रामीण पोलिसांनी आधीच अटक केली होती. मात्र, उर्वरित आरोपी सातत्याने ठिकाणे बदलून पोलिसांना चकवा देत होते. यातील एक आरोपी ओमकार फसले हा स्वतःच्या गावात लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली. थेट गावात गेल्यास तो पळून जाईल, म्हणून एलसीबीच्या पथकाने 'रस्त्याचे काम करणारे ठेकेदार' म्हणून वेषांतर करून म्हाळस जवळा गाव गाठले.

गावातील एका पानटपरीवर थांबून पोलिसांनी चालकासोबत संवाद साधला आणि "बीडजवळ उड्डाणपुलाचे काम सुरू असून तिथे टिपर चालवण्यासाठी चांगल्या पगारावर ड्रायव्हर पाहिजे, एका ट्रिपचे १० हजार मिळतील अशी बतावणी केली. यावेळी टपरी चालकाने गावातील ओमकार फसले चालक असल्याचे सांगत, ओमकारच्या सोबत असलेल्या एका मित्राला फोन करून या चांगल्या पगाराच्या नोकरीची माहिती दिली.

मित्राने ही माहिती ओमकारला देताच, त्याने तत्काळ होकार दिला आणि तो पानटपरीवर आला. तिथे येताच ठेकेदाराच्या वेशातील पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. दुसरीकडे, पोलिसांच्या एका स्वतंत्र पथकाने कायगाव टोका परिसरात सापळा रचून भिमराव ऊर्फ शहादेव तांदळे आणि सुनील चव्हाण या दोघांना अटक केली. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

शेंडगे गावात असतानाही पोलिसांना सापडत नव्हता

या दरोड्यासाठी सुनील शेंडगे याने स्वतःचे वाहन टोळीला दिले होते. हा शेंडगे परशुराम गायकवाड याच्या मोस्ट वॉन्टेड टोळीचा सक्रिय साथीदार असून, गुटख्याच्या गाड्या लुटण्यात सराईत आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी वाळूज भागात गुटखा पकडणाऱ्या 'एफडीए'च्या पथकाच्या अंगावर गाडी घालून त्याने गुटख्याचा टेम्पो पळवला होता. या गुन्ह्यात तो गेल्या ३ महिन्यांपासून शहर पोलिसांना गुंगारा देत होता. एलसीबीच्या पथकाने त्याला तिसगाव परिसरातून शिताफीने बेड्या ठोकल्या आहेत.

या पथकाने केली कारवाई

पोलिस अधीक्षक प्रकाश जाधव, अपर अधीक्षक प्रशांत स्वामी, उपअधीक्षक भागवत फुंदे, विनय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली, एलसीबीचे पोलिस निरीक्षक विजयसिंग राजपूत, उपनिरीक्षक वैभव रनखांब, भारत निकाळजे, लहू घोडे, महेश घुगे, भागीनाथ वाघ, सचिन सोनार, विष्णु गायकवाड, अशोक वाघ, शिवानंद बनगे, संजय तांदळे, संदीप कोळगे, तांत्रिक विश्लेषण विभागाचे प्रशांत सोनवणे, मेघा माळी, योगेश तरमळे, जीवन घोलप आदी पथकाने दिल्ली, नाशिक, पुणे, अहिल्यानगर, सोलापूर आणि बीड भागात वेश पालटून तपास करत आरोपीना अटक केली.

यापूर्वी या आरोपीना अटक

या प्रकरणात टोळीप्रमुख परशुराम गायकवाड, किरण गायकवाड, करण जाधव, अनिल जाधव, चन्नाअप्पा लष्करे, ज्ञानेश्वर जाधव आणि उमेश गायकवाड यांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT