sambhajinagar zp election
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :
महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्षांनी महापालिकेची निवडणूक स्वतंत्रपणे लढविली. परंतु त्यात तिन्ही पक्षांची वाताहत झाली. तिन्ही पक्षांना ११५ पैकी केवळ ८ जागा मिळाल्या. त्यामुळे आता झेडपी निवडणुकीत स्वबळाऐवजी आघाडी करून लढण्याचे प्रयत्न या पक्षांनी चालविले आहेत. त्यासाठी उद्या सोमवारी (दि.१९) या पक्षांची बैठक होणार आहे. तिन्ही पक्षांनी जागांचे प्रस्ताव एकमेकांकडे सादरही केले आहेत.
छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीवेळी महाविकास आघाडीच्या तिन्ही घटक पक्षांच्या जागा वाटपाबाबत अनेक बैठका झाल्या होत्या. परंतु ऐनवेळी आघाडीत बिघाडी झाली. त्यामुळे तिन्ही पक्षांनी स्वबळ आजमावले. मात्र, तिन्ही पक्षांची कामगिरी अतिशय निराशाजन राहिली.
शिवसेना उबाठाने ९६ उमेदवार दिले होते, परंतु त्यातील केवळ ६ उमेदवारच विजयी झाले. काँग्रेसला ७१ उमेदवार देऊन केवळ एका जागेवर विजय मिळविता आला. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला अवघी १ जागा मिळाली त्यामुळे आता निदान जिल्हा परिषद निवडणुकीत तरी एकत्र लढवून यश मिळविण्याचा प्रयत्न तिन्ही पक्षांकडून केला जात आहे. त्यासाठी तिन्ही पक्षांकडून जागा वाटपाबाबत चर्चा सुरू झाली आहे.
तिन्ही पक्षांनी एकमेकांकडे जागांच्या मागणीचे प्रस्ताव दिले असून याबाबत उद्या सोमवारी प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. सध्या जिल्हा परिषद -साठी नामनिर्देशपत्र स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू आहे. शेवटची तारीख २१ जानेवारी आहे. त्यामुळे सोमवारीच याबाबत अंतिम निर्णय घेण्याचा या पक्षांचा प्रयत्न आहे.
शिवसेना उबाठा आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षांचे प्रस्ताव आमच्याकडे आले आहेत. उद्या सोमवारी त्याबाबत बैठक होऊन निर्णय होईल. जिल्हा परिषदेची निवडणूक एकत्र लढविण्याचा प्रयत्न आहे.
आमच्या पक्षाकडे जिल्ह्यातील ६३ गटांपैकी ४४ ठिकाणांहून उमेदवारांचे अर्ज आले आहेत, परंतु ही निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढविण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी काँग्रेसचे खा. कल्याण काळे यांच्याशी चर्चा झाली आहे.अंबादास दानवे, नेते, शिवसेना उबाठा