Sambhajinagar Youth murdered over land dispute
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जागेवर कब्जा मारून संभाजी कॉलनीत दहशत माजविणाऱ्या राजकीय पक्षाशी संबंधित चौघा बाप-लेकांसह आई, जावयाने जागा मालक कुटुंबावर हल्ला करून वादाचा रक्तरंजित शेवट केला. दुकानदार तरुणाच्या पाठीत एकापाठोपाठ आरपार चाकू खुपसून निघृण हत्या केली. त्याच्या वडिलांच्या पाठीत चाकूचे घाव तर डोक्यात दगड टाकला. मुलाच्याही छातीत वार, तर आईलाही जिवे मारण्याचा प्रयत्न केला. ही खळबळजनक घटना शुक्रवारी (दि.२२) दुपारी साडेबाराच्या सुमारास सिडको एन-६, संभाजी कॉलनीत घडली.
प्रमोद रमेश पाडसवान (३७, रा. संभाजी कॉलनी) असे हत्या झालेल्या दुकानदाराचे नाव आहे. तर हल्ल्यात प्रमोद यांचे वडील रमेश जगन्नाथ पाडसवान (६०), आई मंदाबाई व मुलगा रुद्राक्ष (१७) अशी गंभीर जखमींची नावे आहेत. याप्रकरणी आरोपी काशिनाथ येडू निमोणे, पत्नी शशिकला, मुलगा ज्ञानेश्वर, गौरव, सौरव निमोणे आणि जावई मनोज दानवे व इतर अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी सौरभ, जावई मनोज, वडील काशिनाथला ताब्यात घेतले. गौरव, ज्ञानेश्वर, शशिकला यांना रुग्णालयात उपचारानंतर ताब्यात घेण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. निमोणे एका राजकीय पक्षाशी संबंधित असून, त्याची या भागात दहशत होती.
फियांदी रमेश जगन्नाथ पाडसवान (६०, रा. संभाजी कॉलनी, सिडको एन-६) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते पत्नी मंदाबाई, मुलगा प्रमोद, सून रोशनी आणि नातू रुद्राक्ष व वेदांत असे एकत्र राहतात. प्रमोद घरीच किराणा दुकान चालवितो. घराचे बांधकाम करण्यासाठी त्यांनी काही दिवसांपूर्वी खडी घरासमोरच्या मोकळ्या जागेत टाकली होती. शुक्रवारी दुपारी पावणेएकच्या सुमारास आरोपी काशिनाथ निमोणे आणि त्याचा मुलगा ज्ञानेश्वर, गौरव, सौरव आणि जावई मनोज दानवे यांनी घरासमोर येऊन शिवीगाळ सुरू केली. रमेश यांना धक्काबुक्की करत असताना प्रमोद आणि नातू रुद्राक्ष सोडविण्यासाठी आले. तेव्हा आरोपींनी प्रमोद यांना खाली पाडून ज्ञानेश्वरने प्रमोदच्या पाठीत एका पाठोपाठ चाकूने आरपार भोसकले. आज यांचा खेळच संपवून टाकू, असे म्हणत रमेश याना सौरव, दानवे आणि काशिनाथ याने पकडले. शशिकला हिने चाकू सौरवकडे दिला.
सौरवने रमेश यांच्या कमरेत चाकू खुपसला. ते खाली पडताच नातू रुद्राक्ष मदतीसाठी धावला. तेव्हा याला पण सोडू नका म्हणत दानवे व ज्ञानेश्वरने रुद्राक्षच्या छातीत जबर वार केला. रमेश यांच्या डोक्यात आरोपींनी दगड टाकून गंभीर जखमी केले. मंदाबाईंनाही मारहाण केली. प्रमोद रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेले होते. स्थानिकांनी जखमींना एमजीएम रुग्णालयात नेले. दुपारी तीन वाजता डॉक्टरांनी प्रमोद यांना तपासून मृत घोषित केले. सध्या रमेश व रुद्राक्ष यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे, उपनिरीक्षक निवृत्ती गायके यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली. सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास एपीआय योगेश गायकवाड करत आहेत.
आरोपींनी टोळीने हल्ला केला. बारंबार पाडसवान यांना त्रास दिला आहे. त्यामुळे त्यांच्यावर मोक्काचा गुन्हा दाखल करण्याची मागणी कुटुंबीयांनी केली आहे. शनिवारी (दि.२३) सकाळी १० वाजता सिडको पोलिस ठाण्यावर मोर्चा काढण्यात येणार आहे. मागणी पूर्ण होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबीयांनी नकार दिला आहे.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, पाडसवान यांनी सिडकोकडून घरासमोरचा खुला प्लॉट काही वर्षांपूर्वी विकत घेतला. तेव्हा तिथे आर-ोपी निमोणे याचा ढोल-ताशा पथकाचे ढोल ठेवलेले होते. तसेच शेडही होते. तो काढत नसल्याने पाडसवान यांनी सिडकोकडे तक्रार केल्यानंतर शेड काढण्यात आले. मात्र ढोल तसेच ठेवले. तेही मनपाकडे तक्रारी केल्यानंतर जप्त करण्यात आले. त्यामुळे निमोणे पाडसवानवर राग धरून होता. चार महिन्यांपूर्वी निमोणेने सुमारे १०० बोल मनपाकडून सोडवून आणले. ते प्लॉटच्या तिन्ही बाजूंनी रस्त्यावर लावून ठेवले. दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून दोन्ही कुटुंबांत याच जागेवरून वाद सुरू होता. ही जागा निमोणेला कब्ज्यात ठेवायची होती, असे स्थानिकांनी सांगितले.
पाडसवान यांनी पोलिसांकडे सात वेळा निमोणेविरुद्ध तक्रार अर्ज केले, जीवाला धोका असल्याचेही सांगितले होते. मात्र निमोणे राजकीय पक्षाशी संबंधित असल्याने या भागात दहशत करायचा. त्यामुळे त्याच्यावर कारवाई झाली नाही. पोलिसांनी वेळीच कारवाई केली असती तर आमचा प्रमोद आज जिवंत असता, असा आरोप नातेवाइकांनी पोलिस अधिकाऱ्यासमोर रुग्णालयाच्या दारात केला.
निमोणेने पाडसवान कुटुंबावर चाकूहल्ला करून बाप-लेक नातवाला भोसकले. तेव्हा दारात, घरासमोर, रक्ताच्या चिळकांड्या उडाल्याने सडा पडला होता. नागरिकांसमोरच घडलेल्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. ज्ञानेश्वर एका आरोपीचा कार्यकर्ता एका गंभीर गुन्ह्यामुळे कायम चर्चेत राहणाऱ्या एका राजकीय पक्षाशी संबंधित माजी पदाधिकाऱ्याचा ज्ञानेश्वर निमोणे कार्यकर्ता आहे. पाण्याच्या टँकरचा व्यवसायही हाच पाहत होता, असे सूत्रांनी सांगितले. ज्ञानेश्वरचा सहा दिवसांपूर्वीच साखरपुडाही झाला होता. गौरव व सौरव जुळे आहेत. आता अख्खे निमोणे कुटुंब खुनाच्या गुन्ह्यात गजाआड झाले आहे.
हत्या झालेले प्रमोद पाडसवान यांनी डी फार्मसीची पदवी घेतली होती. बजाजनगरात त्यांचा प्लास्टिक मोल्डिंगचा व्यवसाय होता. कोरोनात तो बंद करून त्यांनी घरातच किराणा दुकान सुरू केले होते. सर्व कुटुंब अतिशय शांत व दुकान सांभाळून कोणाच्याही वादात कधी पडले नाही, पण या घटनेने प्रमोद यांच्या खुनाने सर्वजण हळहळ व्यक्त करत होते.