छत्रपती संभाजीनगर: शहरवासीयांची २० वर्षांपासूनची पाण्याची प्रतीक्षा अखेर संपली आहे. नव्याने टाकण्यात आलेल्या २५०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीतून मंगळवारी (दि.१४) सकाळी ७ वाजता सोडण्यात आलेले पाणी सात तासांनंतर दुपारी १.५० वाजेच्या सुमारास नक्षत्रवाडी जलशुद्धीकरण केंद्रात धडकले.
हर हर महादेव, सियावर रामचंद्र की जय, गणपती बाप्पा मोरया आदी जयघोषणांसह आतषबाजीने या ऐतिहासिक क्षणाचे स्वागत केले. तर महापालिका आयुक्त अमोल येडगे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता मनीषा पलांडे, जीव्हीपीआरचे मुख्य व्यवस्थापक महेंद्र गोगुलोथू यांनी श्रीफळ फोडून पुष्य अर्पण करीत जलपूजन केले. त्यासोबतच २० मेपासून शहरवासीयांना वाढीव पाणी मिळेल, अशी ग्वाहीही दिली.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ७०० मिमी आणि १४०० मिमी व्यासाच्या जलवाहिन्या कालबाह्य झाल्या आहेत. त्यामुळे वाढत्या शहराची तहान भागविण्यासाठी नवीन समांतर जलवाहिनी टाकणे आवश्यक आहे, अशी मागणी सर्वप्रथम २००६ सालच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी शिवसेना-भाजपच्या नगरसेवकांकडून करण्यात आली.
महापौर किशनचंद तनवाणी यांनी पीपीपी तत्त्वावर योजनेचे नियोजन करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. हा प्रस्ताव राज्य शासनामार्फत पाठविण्याऐवजी माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी थेट केंद्राकडे सादर केला, परंतु असे प्रस्ताव राज्याकडून येणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आल्याने प्रस्ताव राज्य शासनाकडून सादर केला गेला. त्यात तत्कालीन महापौर तथा विद्यमान राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या कार्यकाळात केंद्राकडून समांतरसाठी १६९ कोटींचा निधी प्राप्त झाला होता. कंत्राटदार नियुक्तीची प्रक्रिया आणि समांतरच्या प्रवासाला सुरुवात झाली. यात वॉटर युटिलिटीला काम देण्यात आले. परंतु तत्कालीन आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी कंत्राटदाराच्या कामावर ताशेरे ओढत २०१६ साली कंत्राट रद्द केले होते.
अखेर शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजना तयार करण्यात आली. या योजनेला शासनाची मान्यता मिळल्यावर निविदा प्रक्रिया करण्यात आली, त्यात जीव्हीपीआर इंजिनिअर्स या कंपनीची निविदा पात्र ठरली. या कंपनीला फेब्रुवारी २०२१ मध्ये वर्कऑर्डर दिली. मात्र प्रत्यक्षात काम २०२२ साली सुरू झाले. त्याचवेळी योजनेच्या खर्चावरून कंत्राटदार आणि प्रशासनात मतभेत सुरू झाले.
कंत्राटदाराने वाढीव खर्चाची मागणी केली. अखेर १६८० कोटी रुपये खर्चाची ही योजना २७४० कोटी रुपयांवर पोहोचली. त्यानंतर योजनेला गती मिळाली, अगोदर जायकवाडी धरण ते नक्षत्रवाडी या ३८ किलोमीटर अंतरात प्रथम २५०० मिमी व्यासाची जलवाहिनी अंथरूण त्याची जोडणी करण्यात आली. त्यासोबतच सप्टेंबर २०२४ मध्ये जायकवाडी धरणात जॅकवेलच्या कामाला सुरुवात करण्यात आली. ३९२ एमएलडी क्षमतेच्या या योजनेचा पहिला टप्पा पूर्ण करून त्यातून २०० एमएलडी पाणीपुरवठा करण्याचे नियोजन मागील वर्षभरापासून सुरू होते.
२३ दिवसांत पाणी नक्षत्रवाडीत
पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाल्यानंतर २३ मार्चपासून मुख्य जलवाहिनीसह जॅकवेल, पंप, व्हॉल्व्हच्या चाचणीला सुरुवात करण्यात आली. जायकवाडी धरणातून जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा सुरू केल्यानंतर ३८ किलोमीटर अंतराच्या मुख्य जलवाहिनीवर दर चार किलोमीटरवर बटरफ्लाय व्हॉल्व्ह आणि स्क्रोल व्हॉल्व्ह बसवण्यात आले. या सर्वांची चाचणी करण्यात आली. पहिल्यांदा स्क्रोल व्हॉल्व्ह गळतीचा प्रकार समोर आला. त्यानंतर कवडगावजवळ जलवाहिनीची वेल्डिग निखळल्याचा प्रकार पुढे आला. या सर्वांची दुरुस्ती होत नाही. तोच ढोरकीनजवळ स्क्रोल व्हॉल्व्ह तुटण्याची घटना घडली. या सर्व संकटावर मात करून अखेर २३ व्या दिवशी १४ एप्रिल रोजी पाणी नक्षत्रवाडीत धडकले.
एक तास पाणीपुरवठा
नक्षत्रवाडी जलशुद्धीकरण केंद्रात दुपारी १.५० वाजेच्या सुमारास पाणी धडकले. ४ हजार क्युसेक क्षमतेने पाणी जलवाहिनीतून नक्षत्रवाडीत येत राहिले. त्यानंतर तब्बल १ तास जायकवाडीतील जॅकवेलमधून पंपिंग सुरूच ठेवण्यात आली होती. एक ३७०० अश्वशक्ती क्षमतेच्या पंपातून पाणीपुरवठा सुरू राहिला.
१५००, २००० च्या जलवाहिनींवर भर
जलवाहिनीतून घेण्यात आलेले हे पाणी आता पुन्हा मागे नेले जाणार आहे. त्यानंतर पुढील दहा दिवसांत जलवाहिनी स्वच्छ करण्यात येणार आहे. जलवाहिनी स्वच्छ झाल्यानंतर पाणी एमबीआरमध्ये घेण्याचे नियोजन असल्याचे मुख्य अभियंता मनीषा पलांडे यांनी सांगितले. नवीन मोठ्या क्षमतेचे आणि जुने छोट्या क्षमतेचे असे दोन एमबीआर आहेत. यातील छोट्या क्षमतेच्या एमबीआरमधूनही वाढीव पाणी देण्याचे नियोजन आहे. १५ ते २० मेपर्यंत हे पाणी दिले जाऊ शकते, असेही त्या म्हणाल्या, त्यासाठी १५०० आणि २००० मिमी व्यासाच्या वितरण वाहिन्यांच्या जोडणीचे काम पूर्ण करण्यावर भर देण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
पाण्याने साधला डॉ. आंबेडकर जयंतीचा मुहूर्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री संजय शिरसाट, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या पाठबळामुळे प्रचंड आव्हानांवर मात करीत नवीन पाणीपुरवठा योजनेतून अखेर 30 शहरात पाणी आणण्यात यश आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी शहरासाठी चांगली सुरवात झाली. हा योगायोग असून, येत्या २० मेपासून शहराला वाढीव पाणी देणार आहोत. तसेच कंत्राटदार कंपनीला एक महिन्याचे नियोजन दिले आहे.अमोल येडगे, आयुक्त, महापालिका
महिनाभरात ५० एमएलडी देणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पापैकी एक असलेल्या पाणीपुरवठा योजन-`चा पहिला टप्पा १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी पूर्ण झाला आहे. हा सोनेरी योगायोगाच आहे. आता संपूर्ण शहराला अडीच महिन्यांत २०० एमएलडी वाढीव पाणी मिळेल. परंतु येत्या महिनाभरात जुन्या एमबीआरमधून जुन्या शहराला ५० एमएलडी वाढीव पाणी देता येणार आहे.मनीषा पलांडे, मुख्य अभियंता, एमजेपी
काम पूर्ण झाल्याचे समाधान छत्रपती संभाजीनगरची पाणीपुरवठा योजना ही राज्यातील सर्वात मोठी पाणी योजना आहे. या योजनेचे काम ३ वर्षांत पूर्ण करून पाणी शहराच्या हद्दीत आणले याचे समाधान आहे. - योजनेच्या कामाचा प्रत्येक टप्पा हा आव्हानात्मकच राहिला. मात्र महापालिका आयुक्त, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, एमजेपीच्या मुख्य अभियंता मनीषा पलांडे व त्यांची टीम सतत सोबत होती. त्यामुळे प्रत्येक संकटावर मात करणे शक्य झाले. कुटुंबाकडे पाठ फिरवून जीवाची परवा न करता काम केले.महेंद्र गोगुलोथू, मुख्य व्यवस्थापक, जीव्हीपीआर