छत्रपती संभाजीनगर : शनिवार आणि रविवारच्या सुटीत कुटुंबीयांसोबत शेगावला देवदर्शनासाठी गेलेल्या कुटुंबाच्या घरावर चोरट्याने डल्ला मारला. ही घटना रविवारी (दि.१२) मध्यरात्री विष्णूनगर भागात घडली. घरातून १३ हजार रुपयांची रोकड, दीड तोळे सोने आणि २४० ग्रॅम चांदीचे दागिने असा ऐवज लंपास केला. विशेष म्हणजे, चोरी करताना कुणाला चाहूल लागू नये म्हणून चोरट्यांनी वरच्या मजल्यावर झोपलेल्या एका नातेवाइकाला बाहेरून कडी लावून आतच कोंडले होते. याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी उमेश सखाराम वाणी हे एका खासगी बँकेत नोकरी करतात. विष्णूनगर येथे त्यांचे घर खालच्या मजल्यावर असून, त्यांचा भाऊ वरच्या मजल्यावर राहतो. शनिवारी सकाळी उमेश आणि त्यांच्या भावाचे कुटुंब असे सर्वजण शेगाव येथे देवदर्शनासाठी गेले होते. दोन दिवस घरी कोणीही नसल्याने त्यांनी भावाच्या मेहुण्याला रात्री झोपण्यासाठी बोलावले होते. त्यानुसार मेहुणा रात्री वरच्या खोलीत झोपला होता, तर खालचे घर पूर्णपणे बंद होते.
या संधीचा फायदा घेत रविवारी मध्यरात्री चोरट्यांनी खालच्या घराचे लॉक तोडले आणि घरात प्रवेश केला. खालच्या रूममधील ऐवज लंपास केल्यानंतर वरच्या रूमकडेही मोर्चा वळवला. मात्र वरच्या रूममध्ये कोणीतरी असल्याची कुणकुण लागल्याने त्यांनी त्या खोलीला बाहेरून कडी लावून पोबारा केला. सकाळी मेहुणा झोपेतून उठल्यावर त्याला दरवाजा उघडत नव्हता. त्याने भाऊजींना फोन करून दरवाजाचा काही प्रॉब्लेम आहे का, अशी विचारणा केली. मात्र दरवाजाला कोणतीही अडचण नसल्याचे उमेश यांनी सांगितले.
मेहुण्याने खिडकीतून हात बाहेर काढून मोबाईलच्या कॅमेऱ्याने दरवाजाचा फोटो काढला. तेव्हा बाहेरून कडी लावल्याचे समोर आले. यानंतर मागच्या दरवाजातून गेटची चावी शेजाऱ्यांकडे देऊन त्याने कशीबशी स्वतःची सुटका करून घेतली. त्यानंतर खाली जाऊन तपासणी केली असता, घराचे लॉक तुटलेले आणि कपाट उचकटलेले दिसल्याने चोरी झाल्याचे स्पष्ट झाले.
हा ऐवज गेला चोरीला
कपाटातील १३ हजार रुपयांची रोख रक्कम, ९ ग्रॅमच्या सोन्याच्या तीन अंगठ्या, ३ ग्रॅमचा सोन्याचा ओम आणि ३ ग्रॅमचे सोन्याचे टॉप्स, चांदीचे पैंजण (३ जोड), चांदीचे वाळे (३ जोड), पायातले चांदीचे वाळे (३ जोड), चांदीच्या साखळ्या (४ नग).