Devendra Fadanvis Pudhari
छत्रपती संभाजीनगर

Devendra Fadnavis | देशासाठी पदके जिंकणारे खेळाडू संभाजीनगर येथे घडतील : मुख्यमंत्री

गारखेडा येथील विभागीय क्रीडा संकुलात उभारण्यात आलेल्या ४०० मीटर सिंथेटिक ट्रॅक, फुटबॉल मैदान, फ्लडलाईट्स आणि युवा वसतिगृहाचे रविवारी (दि.१) रोजी लोकार्पण

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : विभागीय क्रीडा संकुलातील अत्याधुनिक सिंथेटिक ॲथलेटिक्स ट्रॅकवर सराव करणाऱ्या मुला-मुलींमधून भविष्यात देशासाठी पदके जिंकणारे खेळाडू घडतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. गारखेडा येथील विभागीय क्रीडा संकुलात उभारण्यात आलेल्या ४०० मीटर सिंथेटिक ट्रॅक, फुटबॉल मैदान, फ्लडलाईट्स आणि युवा वसतिगृहाचे त्यांच्या हस्ते रविवारी (दि.१) लोकार्पण करण्यात आले.

गारखेडा येथील विभागीय क्रीडा संकुलात अत्याधुनिक सिंथेटिक ॲथलेटिक्स ट्रॅकसह फुटबॉल मैदान, फ्लडलाईट्स आणि युवा वसतिगृहाचे रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या सुविधांच्या उभारणीसाठी क्रीडा विभाग आणि विभागीय क्रीडा संकुल समितीचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले. नव्या ट्रॅकवर सराव करणाऱ्या खेळाडूंना शुभेच्छा देत त्यांनी राष्ट्रीय स्तरावर यश मिळविण्याचा विश्वास व्यक्त केला.

सुमारे १२ कोटी ७५ लाख रुपये खर्चून आठ लेनचा ४०० मीटर सिंथेटिक ट्रॅक आणि नैसर्गिक हिरवळीचे फुटबॉल मैदान विकसित करण्यात आले आहे. १०० मीटर धावण्यासाठी दहा लेन असून धावणे, रिले, अडथळा शर्यत, लांब-उंच उडी, गोळाफेक आणि भालाफेक यांचा सराव व स्पर्धा घेता येणार आहेत.

फुटबॉल मैदानावर आधुनिक स्प्रिंकलर यंत्रणाही बसविण्यात आली आहे. तसेच दहा हजार प्रेक्षक क्षमतेच्या स्टेडियममध्ये चार मास्टवर ८८ दिवे बसविण्यात आले आहेत. यासाठी ११ कोटी ६७ लाख ४२ हजार रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. चार कोटी रुपये खर्चून उभारलेल्या युवा वसतिगृहात १६ खोल्या, परिषद सभागृह, स्वयंपाकगृह, भोजनगृह, ग्रंथालय आणि वाचनकक्ष आहेत.

मुख्यमंत्र्यांना क्रीडा साहित्य संच भेट

यावेळी मुख्यमंत्र्यांना सिंथेटिक ट्रॅकची प्रतिकृती, अजिंठा-वेरूळ शिल्पाचे सन्मानचिन्ह आणि डीएफ क्रीडा साहित्य संच भेट देण्यात आला. नव्या सुविधांमुळे मराठवाड्यातील खेळाडूंना सराव, प्रशिक्षण, निवास आणि राष्ट्रीय-राज्यस्तरीय स्पर्धांच्या आयोजनासाठी दर्जेदार सुविधा उपलब्ध झाल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT