V G Purnapatre Book On Sonali lioness
छत्रपती संभाजीनगर : उमेश काळे
कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठातील महादेवी हत्तीणीला गुजरातमधील वनतारा येथे पाठवत असताना नागरिक आणि हत्तीणीला भावना अनावर झाल्याचे अवघ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. जंगलात राहणार्या प्राण्यांवर प्रेम केल्यानंतर प्राणीसुद्धा आपल्यावर जीवापाड प्रेम करतात, असा संदेश या घटनेतून मिळतो. अशाच प्रकारचा अनुभव चाळीसगाव (जि. जळगाव) येथील डॉ. वा. ग. ऊर्फ काकासाहेब पूर्णपात्रेंच्या कुटुंबीयांना आला होता. उत्तम शिकारी असणार्या डॉ. पूर्णपात्रे यांनी ‘सोनाली’ नावाची सिंहीण पाळली होती. तिला पुण्याच्या पेशवे पार्कमध्ये हस्तातंरित करताना हिंस्त्र प्राण्यांसोबत असणार्या मानवी ऋणानुबंधाचे दर्शन त्यांनी लिहिलेल्या ‘सोनाली’ या पुस्तकातून घडते.
सोनालीसोबत असणारे अनुभव डॉ. पूर्णपात्रे यांच्या पुस्तकात असून, या पुस्तकातील एका पाठाचा समावेश दहावीच्या अभ्यासक्रमात 2018 पासून करण्यात आला आहे. या पुस्तकातील एक प्रकरण नववीतील विद्यार्थ्यांसाठी होते, त्यानंतर काही काळ ते वगळण्यात आले होते.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड- चाळीसगाव सीमेवर असणार्या गौताळा, पाटणादेवी जंगलात पूर्वी वन्यप्राण्यांचा मोठा वावर होता. शिकारीला कायद्याने बंदी नव्हती. हिंस्त्र प्राण्यांचा शेतकर्यांना त्रास होत असे. डॉ. पूर्णपात्रे हे मूळचे चाळीसगावचे. वैद्यकीय व्यवसायाबरोबर उत्तम शिकारी असणार्या डॉ. पूर्णपात्रे यांनी 15 मोठ्या प्राण्यांची शिकार केली होती. अर्थात त्यांना पक्षी, प्राणी पाळण्याचाही छंद होता. ‘गीता’ नावाची वाघीण त्यांच्याकडे होती. 29 ऑगस्ट 1973 रोजी त्यांचे मित्र डॉ. चित्रे यांनी आणलेल्या सिंहीणच्या तीन पिल्लांपैकी कमी गुरगुरणार्या पिल्लाची त्यांनी निवड केली. या पिल्लाचे नाव‘सोनाली’ असे ठेवले होते.
सोनाली नाव का ठेवले...
या सिंहकन्येचे आगमन होण्यापूर्वी पंधरा दिवस अगोदर पांढर्या शुभ्र केसांच्या कुत्रीचे आगमन डॉक्टरांकडे झाले होते. तिच्या रूपावरून तिचे नाव ‘रूपाली’ ठेवले होते. काही दिवसांनंतर डॉक्टरांना नात झाली. तिचे नाव ‘दीपाली’ (डॉ. सुभाष पूर्णपात्रे यांची कन्या) असे ठेवले. सिंहकन्येचे नाव काय ठेवावे, या विचारात ते असतानाचा ‘सोनाली’ हे नाव सुचले. याबद्दल पुस्तकात डॉ. पूर्णपात्रे लिहितात, सोन्यासारखे केस असलेली सुवर्णकांतीची ती मादी कोचावर बसली होती. तिच्या पाठीवरून हात फिरवताना मला एक नाव सुचले ‘सोनाली’.
डॉक्टरांच्या बेडवर झोप...
झोपायची वेळ झाली की, ‘सोनाली’उडी मारून बिछान्यात शिर, पण चटकन झोपी जायचा तिचा स्वभावच नव्हता. बिछान्यात आली की ती माझं तोंड चाटे, पंजाने माझे केस विस्कटून टाकत असे, कधी तिची आणि रूपालीची दंगामस्ती बिछान्यातच चालत असे. सोनालीला लहान मुलासारखं मला थोपटून झोपवावं लागे, तेव्हा कुठे बाईसाहेब झोपत. तीही एखाद्या लहान मुलासारखी अस्ताव्यस्त. त्या दोघींच्यामध्ये मलाही झ्रोपायला जागा मिळत नसे, असा अनुभव त्यांनी नमूद केला आहे.
दूधभात खाणारी सिंहीण
सोनाली, रूपाली आणि दीपाली या गच्चीवर खेळत असत. त्याबद्दल डॉक्टरांनी एक श्वानकन्या, एक सिंहकन्या आणि एक डॉक्टर कन्या असा उल्लेख केला आहे. सोनाली दिवसातून तीन वेळा जेवत असे. सकाळी नाश्ता. त्यात दूध आणि अंडी असत. दुपारी जेवताना खिमा आणि रात्री दूध पोळी किंवा दूध भात. जेवायची वेळ झाली की, ती स्वयंपाकघरात जाई आणि स्वयंपाकीणबाईच्या पायात घोटाळत राही. तोंडानं आव आव करीत त्यांच्याकडे जेवणाची मागणी करी. पण तिचं जेवण ताटलीत पडलं की ती गुरगुरायला लागे. जिभेनं ताटली चाटून पुसून साफ होईपर्यंत तोंडानं तिची गुरगुर चालूच राही. दूध पोळी किंवा दूध भात खाणारी जगातली ती एकमेव सिंहीण असावी, असा अभिप्राय डॉक्टरांनी पुस्तकात नोंदविला आहे.
पेशवे पार्ककडे हस्तांतरण
31 मार्च 1974 रोजी पुण्यातील पेशवे बागकडे सोनाली हस्तातंरित करण्याचे ठरले होते. त्यादिवशी घरातील वातावरण सुतकी होते, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत. मी पिंजर्यात गेल्यानंतर सोनाली आत आली, बाहेर पडल्यानंतर पुन्हा बाहेर आली. अखेरीस रूपाली कुत्रीला आतमध्ये ठेवून नंतर तिला बाहेर काढले व पिंजरा बंद केला, अशी आठवण या पुस्तकात आहे. सोनाली मोठी होईपर्यंत पेशवे पार्कला तिला भेटण्यासाठी डॉ. पूर्णपात्रे जात तेव्हा ती लळा लावत असे, असा आशय पुस्तकात आहे.
करवलीसारखी राहिली
अहिल्यानगरात नेत्रतज्ज्ञ असलेल्या डॉ. दीपाली पूर्णपात्रे यांनी एका शैक्षणिक ऑनलाईन चर्चासत्रात काही आठवणी शेअर केल्या आहेत. मी सिंहिणीशी खेळत होते, तेव्हा तर काही कळतच नव्हते. सिंहीण काही करणार नाही, असा कुटुंबीयांचा विश्वास होता, असे सांगून त्या म्हणाल्या की, सोनालीला उद्यानात सोडल्यानंतर काही दिवस तिने जेवण घेतले नाही. यासंदर्भात उद्यानाकडून पत्र आल्यानंतर आम्ही सर्वजण पुण्याला गेलो. तेथे आजोबांनी अर्थातच डॉ. पूर्णपात्रे यांनी सोनालीला दिसणार नाही अशा ठिकाणावरून तिला हाक मारली. तेव्हा हा आवाज डॉक्टरांचाच आहे, असे तिने ओळखले व ती कावरीबावरी झाली. आपले आजोबा, रूपाली कुत्रीला घेऊन आतमध्ये गेले. सोनालीला दूध पाजले व शांत केले, पण बाहेर पडलो तर पुन्हा ती जेवणार नाही म्हणून रूपालीला तेथे सोनालीसोबत काही दिवस ठेवले, ती अगदी करवलीसारखी तिच्यासोबत राहिली, असे त्यांनी सांगितले.