छत्रपती संभाजीनगर : स्मार्ट मीटर ग्राहकांसाठी कसे फायद्याचे आहे. ग्राहकांने वापरलेल्या विजेचा लोखाजोखा प्रत्येक तासाला मिळणार, असे गुणगाण करणारे महावितरणचे अधिकारी मात्र गारखेडा परिसरातील न्यू गणेशनगरात राहणाऱ्या एका ग्राहकाला एका महिन्याचे वीज बिल ६७,६७० रुपये कसे आले. या वीज वापराची माहिती देण्यास नकार देत असून, तुम्ही कार्यालयात या बसून बोलू, असा तगादा लावला आहे.
न्यू गणेशनगरातील मुकेश जाधव या ग्राहकाला एका महिन्याचे वीज बिल चक्क ६७,६७० रुपये (युनिट ३१७८) आले. याबाबतचे पुढारीने वृत्त प्रकाशित करताच ग्राहकांना महावितरणचे उंबरठे झिजवायला लावणारे अधिकारी-कर्मचारी चक्क त्या ग्राहकांच्या घरी चकरा मारत आहेत. सुरुवातीला पाच हजार कमी होतील, असे म्हणणारे अधिकारी गुरुवारी (दि.९) तुमचे बिल कमी केले आहे.
केवळ ४२ हजार रुपये भरा, अशी विनवणी करत आहेत. ग्राहक मात्र माझा वीज वापर महिनाभरात किती झाला याची डिटेल माहिती द्या यावर आडून बसला आहे. तर अधिकारी टीओडी मीटर असतानाही त्या ग्राहकाला माहिती देण्यास नकार देत आहेत. अधिकाऱ्यांच्या नकारामुळे मीटरबाबत शंका निर्माण होत आहे.
कार्यालयात या बसून बोलू
या ग्राहकाला गुरुवारी सकाळपासून तीन ते चार वेळा तर बुधवारी (दि.८) दोन वेळा महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी मोबाईलवर संपर्क साधला. तुमचे बिल कमी केले असून, तुम्ही आमच्या कार्यलायात या बसून बोलू, असे वारंवार सांगत आहेत. एरव्ही पन्नालालनगर येथील कार्यालय आणि मुख्य कार्यालयाचे उंबरठे झिजवल्यानंतरही महावितरण ग्राहकांचे समाधान करत नसल्याने नागरिकांनी स्मार्ट मीटरबाबत संताप व्यक्त केला.
लिफाफ्यात काय दडले ?
महावितरणचे कर्मचारी गुरुवारी सकाळीच या ग्राहकांच्या घरी धडकले. त्यांनी सोबत एक लिफाफा आणला होता. हा लिफाफा घ्या, असा आग्रह ग्राहकाला करण्यात आला. त्यात काय आहे याची माहिती मात्र कर्मचारी देत नव्हते. लिफाफा घेण्यास नकार दिल्यानंतर ते कर्मचारी परतले, परंतु कार्यालयातून वारंवार संपर्क साधत तो लिफाफा घेऊन जाण्यास सांगण्यात येत होते. नेमके लिफाफ्यात काय दडले, याची उत्सुकता ग्राहकाला आहे. दरम्यान, ग्राहकांच्या अडचणीचे समाधान करण्याऐवजी येथील अधिकारी-कर्मचारी कागदी घोडे नाचवत असल्याने ग्राहकाने नाराजी व्यक्त केली आहे.