Chhatrapati Sambhajinagar Voter List pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar Voter List : भाजपच्या एक गठ्ठा फॉर्म ७विरोधात एमआयएम मैदानात

प्रारूप मतदार यादीवर आक्षेपांचा पाऊस, पूर्व, मध्य मतदार संघ आघाडीवर

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : एसआयआरच्या प्रक्रियेनंतर प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार यादीतील नावांवर आक्षेपांचा पाऊस पडत आहे. यात प्रामुख्याने भाजपकडून एक गठ्ठा फॉर्म ७ दाखल करण्यात येत असून सर्वाधिक आक्षेप पूर्व व मध्य मतदार संघात घेण्यात आल्याचा आरोप एमआयएमने केला आहे.

त्यामुळे भाजपच्या एक गठ्ठा आक्षेपांविरोधात आता एमआयएम मैदानात उतरली असून सोमवारनंतर मंगळवारी (दि. १३) महापालिकेतील विरोधी पक्ष नेता समीर साजेद बिल्डर यांनी विभागीय आयुक्तांची तर शहराध्यक्ष शारेक नक्षबंदी यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांची भेट घेत प्रक्रियेवरच प्रश्न उपस्थित केला.

एसआरआयच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रक्रियेनंतर जिल्हा निवडणूक विभागाने प्रारुप यादी प्रसिद्ध केली. या प्रारूप यादीवर आक्षेप नोंदविण्यासाठी नागरिकांना महिन्याभराची मुदत देण्यात आली होती. त्याची मुदत १२ ऑक्टोबरला संपली. परंतु, शेवटच्या तीन दिवसांत मतदार यादीवर हजारोंच्या संख्येत आक्षेप दाखल झाल्याची माहिती प्रशासकीय यंत्रणांकडून देण्यात आली.

सोमवारी मुदत संपण्यापूर्वीच निवडणूक आयोगाने पुन्हा यात मुदतवाढ देत प्रक्रिया एक महिन्याने वाढविली आहे. असे असले तरी प्रत्यक्षात १२ ऑक्टोबरपर्यंत दाखल झालेल्या आक्षेपांचा आकडाच प्रचंड प्रमाणात असल्याचा आरोप एमआयएमकडून करण्यात येत आहे. जिल्ह्यात ऑनलाईनच्या तुलनेत ऑफलाईन आक्षेप अधिक आहेत.

दरम्यान, हे एक गठ्ठा आक्षेप भाजपच्याच पदाधिकान्यांनी बीलोंकडे सादर केले असल्याचा आरोप एमआयएमचे शहराध्यक्ष शारेक नक्षबंदी यांनी मंगळवारी उपविभागीय अधिकारी वेंकट राठोड, उपजिल्हाधिकारी नीलेश अपार, उपजिल्हाधिकारी रुपेश शिंगारे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत केला आहे.

एमआयएमचे स्थानिक नेते तथा महापालिकेतील विरोधी पक्षनेता समीर बिल्डर यांनी सायंकाळी विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधून नारेगाव आणि किराडपुरा भागात घडलेल्या एक गठ्ठा आक्षेप स्वीकारण्याच्या प्रकियेला विरोध दर्शविला. हा प्रकार तातडीने थांबवावा, अशी मागणी केली. शहरातील तिन्ही मतदार संघात हा प्रकार घडला आहे. त्यासोबतच जिल्ह्यात सिल्लोड-सोयगावमध्ये सर्वाधिक आक्षेप दाखल झाल्याचेही प्रशासकीय यंत्रणांकडून सांगण्यात आले आहे.

आक्षेपांच्या तपासणीनंतरच नोटीस- शहरातील पूर्व, पश्चिम आणि मध्य या तिन्ही मतदार संघातील आक्षेपांबाबत एमआयएमकडून तक्रार करण्यात आली होती. त्यांच्या या तक्रारींची सुनावणी मंगळवारी तिन्ही मतदार संघाच्या उपजिल्हाधिकाऱ्यांसमोर झाली. त्यांच्या तक्रारी ऐकून घेण्यात आल्या असून एक गठ्ठा दाखल झालेल्या आक्षेपांची अगोदर तपासणी होईल. त्यानंतरच संबंधितांना नोटीस बजावण्यात येईल. संबंधितांचे म्हणणे ऐकून घेतल्याशिवाय कुठलीही प्रक्रिया होणार नाही, असेही सांगितले.
नीलेश अपार, उपजिल्हाधिकारी
१० हजार नावे वगळण्याचा घाट शहरातील तिन्ही मतदार संघांमध्ये एसआयआरनंतर आता प्रारूप मतदार यादीवर आक्षेप घेण्यात येत आहे. भाजपने पूर्व मतदार संघातील सुमारे १० हजार मतदारांची नावे वगळण्याचा घाट रचला आहे.
शारेक नक्षबंदी, शहराध्यक्ष, एमआयएम

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT