शिवाजीनगर भुयारी मार्गात पुन्हा तुंबणार पाणी pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar News: शिवाजीनगर भुयारी मार्गात पुन्हा तुंबणार पाणी

केबल शिफ्टिंग, साईडड्रेनचे काम रखडले; महावितरण, रेल्वे विभागाचे दुर्लक्ष

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : शिवाजीनगर भुयारी मार्गात तुंबणारे पाणी वाहून जाण्यासाठी अद्यापही रेल्वे विभागाने आवश्यक साईडड्रेनचे काम पूर्ण केले नाही. त्यासोबतच महावितरणने ३३ केव्ही व ११ केव्हीचे केबल शिफ्टिंगकडे दुर्लक्षच केल्याने यंदाच्या पावसाळ्यात पुन्हा भुयारी मार्ग तुंबणार, अशी भीती आतापासूनच व्यक्त होत आहे.

शिवाजीनगर भुयारी मार्गाच्या कामावरून बोंबाबोंब सुरूच आहे. यंदाच्या पावसाळ्यात भुयारी मार्गात पाणी तुंबणार नाही यासाठी मान्सूनपूर्वी शिल्लक दुरुस्तीची सर्व कामे तातडीने पूर्ण व्हावी, यासाठी महापालिका प्रशासन मागील महिनाभरापासून प्रयत्नात आहे. या कामात महापालिकेच्या जलवाहिनीचा मोठा अडथळा होता. परंतु तो महिनाभरापूर्वीच मार्गी लागला आहे. त्यामुळे आता रेल्वे आणि महावितरण विभागाची कामे रखडली आहेत.

गेल्या वर्षी पावसाळ्यात भुयारी मार्गात सतत पाणी तुंबण्याचा प्रकार घडला होता. त्यामुळे वाहनधारकांना त्रासाला सामोरे जावे लागले होते. हीच परिस्थिती येणाऱ्या मान्सूनमध्ये पुन्हा निर्माण होऊ नये, यासाठी महापौर समीर राजुरकर यांनी दोन आठवड्यांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण, रेल्वे आणि महापालिका अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली होती. परंतु या बैठकीतही रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दांडी मारली होती.

भुयारी मार्गात पाणी साचू नये यासाठी रेल्वे विभागाने पाणी वाहून जाणाऱ्या त्यांच्या साईडड्रेनच्या आऊटलेटजवळील शिल्लक काम पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यासाठी गेल्या वर्षी ऑक्टोबर त्यानंतर नोव्हेंबर अशी दोनवेळा रेल्वेचे विभागीय उपव्यवस्थापकांच्या उपस्थितीत पाहणीही झाली होती. या पाहणीत त्यांनी रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांना तीन महिन्यांच्या आत आऊटलेट दुरुस्तीचे काम पूर्ण करावे, असे आदेश दिले होते. परंतु अद्यापही हे काम पूर्ण झाले नाही.

याशिवाय, महावितरणाला केबल शिफ्टिंग करण्याबाबत वारंवार सूचना करूनही अद्यापही त्याकडे दुर्लक्षच झाले आहे. या प्रमुख दोन्ही कामांमुळे शिवाजीनगर भुयारी मार्गात पाणी तुंबण्याची समस्या अजूनही कायम आहे. दरम्यान, ही कामे तातडीने पूर्ण व्हावी, यासाठी सोमवारी रेल्वे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे जागतिक बँक प्रकल्प, महावितरण आणि महापालिका या चारही विभागाकडून संयुक्त पाहणी केली जाणार होती. परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग वगळता इतर विभागाचे अधिकारी फिरकले नाही.

आज होणार पाहणी

शिवाजीनगर भुयारी मार्गात यंदाच्या मान्सूनमध्ये पाणी तुंबणार नाही यासाठी आवश्यक कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी सोमवारी चारही विभागांकडून संयुक्त पाहणी केली जाणार होती. परंतु आता ही पाहणी मंगळवारी सकाळी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

साईड रोडचे कामही रखडले

देवळाईकडून येणाऱ्या उजव्या बाजूच्या साईट रोडचे काम केबल शिफ्टींगमुळे रखडले आहे. देवळाईकडून चार केवल शिवाजीनगरकडे जाणार आहेत. या कामाला रेल्वेने मंजुरी दिल्यानंतरही महावितरणाने अद्याप काम सुरू केलेले नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT