Sambhajinagar Rain: Rain returns to the city area after a week
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा शहर व परिसरात आठवडाभर दडी मारलेल्या पावसाने बुधवारी (दि. १५) सायंकाळी दमदार पुनरागमन केले. सायंकाळी सहाच्या सुमारास सुरू झालेला पाऊस तासभर चांगलाच बरसला. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. गेल्या काही दिवसांपासून कडक उन्हामुळे आणि दमट हवेमुळे त्रस्त झालेल्या शहरवासीयांना या पावसाने काहीसा दिलासा दिला असून, चिकलठाणा वेधशाळेत रात्री आठ वाजेपर्यंत १०.८ मिमी पावसाची नोंद झाली.
सलग आठवडाभर दमदार हजेरी लावल्यानंतर पावसाने ६ जुलैनंतर विश्रांती घेतल्याने शहराचे कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. वाढत्या तापमानासह उकाड्यात वाढ व दमट वातावरणामुळे नागरिक हैराण झाले होते, मात्र मंगळवारी सायंकाळपासून शहरात थंड वारे वाहू लागल्याने हवामान बदलाचे संकेत मिळाले. त्यानंतर बुधवारी सकाळपासूनच आकाश ढगाळ होते. अखेर सायंकाळी सहाच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावत शहराला भिजविले.
दरम्यान, काही भागांत हलक्या, तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या. कार्यालये सुटल्यानंतर पाऊस सुरू झाल्याने घरी परतणाऱ्या चाकरमान्यांची काही काळ धावपळ उडाली. अनेकांनी दुकानांच्या आडोशाला आश्रय घेतला, तर काहींनी पावसात भिजतच घर गाठले. या पावसामुळे शहरातील उकाडा कमी होऊन वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. पुढील काही दिवस मान्सून सक्रिय राहिल्यास शहरासह परिसरातील पाणीसाठ्यांना आणि खरीप पिकांनाही दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दमदार पावसाची अपेक्षा
जुलैच्या पहिल्या आठवड्यानंतर प्रथमच शहरात समाधानकारक पावसाची नोंद झाली. चिकलठाणा वेधशाळेने रात्री आठ वाजेपर्यंत १०.८ मिमी पावसाची नोंद केली. या सरींमुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला असून, आता पुढील काही दिवस मान्सून सक्रिय होऊन दमदार पाऊस पडेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.