Sambhajinagar Political Guardian Minister Sanjay Shirsat Chandrakant Khaire
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: शहराचे ग्रामदैवत श्री संस्थान गणपतीच्या हस्ते आरतीनंतर शनिवारी (दि.६) सकाळी मुख्य विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. तत्-पूर्वी पालकमंत्री संजय शिरसाट हे बाप्पासमोरच चंद्रकांत खैरे यांच्यावर संतापले. मी पालकमंत्री आहे, याचे तरी भान ठेवा, असा रोषही त्यांनी व्यक्त केला.
दरवर्षी राजाबाजार येथील श्री संस्थान गणपती मंदिरात आरती करून शहराच्या मुख्य विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होते. शनिवारीही आरतीसाठी पालकमंत्री संजय शिरसाट, मंत्री अतुल सावे, आ. संजय केणेकर, उबाठा गटाचे नेते चंद्रकांत खैरे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, महासंघ उत्सव समितीचे संस्थापक पृथ्वीराज पवार यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
आरतीसाठी समोरच्या रांगेत मंत्री सावे, आ. केणेकर यांच्यासह खैरेही होते. पालकमंत्री शिरसाट आले तरी ते बाजूला सरकले नाही. त्यामुळे शिरसाट यांनी सर्वांसमोरच नाराजी व्यक्त केली. तुम्हीच करून घ्या आरती, असा रोषही व्यक्त केला.
मंत्री सावे, आ. केणेकर आणि पृथ्वीराज पवार यांनी त्यांना समजावले. मात्र आरती करतानाही खैरेंनी त्यांना काय झाले, असा विचारले तेव्हाही मी पालकमंत्री पदावर आहे. कमीत-कमी हे तर लक्षात ठेवावे, असे शिरसाट म्हणाले.
प्रेमाने रागावलो, त्यांनी ऐकले सत्ता असते तेव्हा चांगले वाटते, गेली तेव्हा वाईट वाटते. या दोन्ही परिस्थितीचे भान माणसाने ठेवले पाहिजे. मी पालकमंत्री आहे, याचे भान ठेवावे म्हणून मी त्यांच्यावर प्रेमाने रागावलो. ते त्यांनी ऐकले. त्यांचे-माझे चांगले संबंध आहेत.- संजय शिरसाट, पालकमंत्री.