Nath Sagar Dam Paithan Pudhari
छत्रपती संभाजीनगर

Nath Sagar Dam | नाथसागर धरण परिसरात ड्रोन चित्रीकरण; एटीएसकडून तरुणावर गुन्हा दाखल

Paithan News | नाथसागर धरण परिसरात सुरक्षेच्या कारणास्तव ड्रोन वापरणे, व्हिडिओ चित्रीकरण किंवा फोटोसेशन करण्यास मनाई

पुढारी वृत्तसेवा

Illegal drone shooting Nath Sagar Dam Paithan

पैठण : प्रतिबंधित क्षेत्र असलेल्या नाथसागर धरण परिसराचे विनापरवाना ड्रोन कॅमेऱ्याने चित्रीकरण करून ते सोशल मीडियावर प्रसारित केल्याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) केली आहे.

या प्रकरणाबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मराठवाड्यातील सर्वात मोठा प्रकल्प असलेल्या नाथसागर धरण परिसरात सुरक्षेच्या कारणास्तव ड्रोन वापरणे, व्हिडिओ चित्रीकरण किंवा फोटोसेशन करण्यास मनाई आहे. तरीही छत्रपती संभाजीनगर येथील मनोज रवींद्र देहाडे (वय 26) या तरुणाने 15 मार्च रोजी सकाळी 9.30 ते 10.30 दरम्यान ड्रोनद्वारे धरण परिसराचे चित्रीकरण करून ते सोशल मीडियावर प्रसारित केल्याचे समोर आले.

ही बाब निदर्शनास आल्यानंतर दहशतवाद विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक दिनकर गोरे यांनी पैठण पोलीस ठाण्याचे निरीक्षक महादेव गोमारे यांच्याकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार संबंधित तरुणाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 223 तसेच वायुमान अधिनियमाच्या कलम 10 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बीट जमादार राजेंद्र जिवडे करत आहेत.

संवेदनशील क्षेत्रात ‘नो ड्रोन झोन’

जायकवाडी (नाथसागर) धरण परिसर हा अत्यंत संवेदनशील आणि संरक्षित क्षेत्र असून शासनाने तो ‘नो ड्रोन झोन’ म्हणून घोषित केला आहे. या भागात ड्रोन उडवण्यासाठी सक्षम प्राधिकरणाची पूर्वपरवानगी घेणे अनिवार्य आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे आवाहन जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत संत आणि धरण शाखा अभियंता मंगेश शेलार यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT