NCP Jitu Pardeshi Co-Opted Member
पैठण : पैठण नगरपरिषदेच्या स्वीकृत सदस्यपदाची आठ महिन्यांपासून प्रलंबित असलेली निवड अखेर सोमवारी (दि. ३१) जाहीर करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे शहराध्यक्ष जितू परदेशी यांची स्वीकृत सदस्यपदी निवड करण्यात आली. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी ही निवड जाहीर केली.
नगरपरिषद सभागृहात सोमवारी नगरसेवकांची बैठक नगराध्यक्षा विद्या भूषण कावसानकर आणि उपनगराध्यक्ष तुषार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. पैठण नगरपरिषदेवर शिवसेना शिंदे गटाचे वर्चस्व असून, शिवसेनेचे १७, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दोन नगरसेवक आहेत.
नगरपरिषद निवडणुकीच्या वेळी स्वीकृत सदस्यपद राष्ट्रवादी काँग्रेसला देण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार आमदार विलास बापू भुमरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून जितू परदेशी यांच्या नावाला हिरवा कंदील दिल्यानंतर त्यांची स्वीकृत सदस्यपदी निवड जाहीर करण्यात आली.
परदेशी यांच्या निवडीची घोषणा होताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. नगरपरिषद परिसरात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. त्यानंतर जितू परदेशी यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली.
या मिरवणुकीत राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. परदेशी यांच्या निवडीचे कार्यकर्त्यांकडून उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.