Sambhajinagar News: School bus driver beats up special child
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :
शहरातील छावणी परिसरात एका नामांकित शाळेच्या स्कूलबसला पोहोचण्यास अवघ्या काही मिनिटांचा उशीर झाला म्हणून एका ९ वर्षांच्या विशेष (दिव्यांग) बालकाला खासगी बसचालकाने अमानुषपणे मारहाण केली. धक्कादायक म्हणजे, या बसचालकाने स्वतः मारहाण करून न थांबता, बसमधील इतर लहान मुलांनाही त्या पीडित वालकाला मारण्यासाठी चिथावणी दिली. ही संतापजनक घटना १७ फेब्रुवारी रोजी मिटमिटा भागात घडली. कासीम असे आरोपी स्कूलबस चालकाचे नाव आहे.
याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिटमिटा परिसरात राहणारा पीडित बालक इयत्ता दुसरीत शिकतो. तो विशेष प्रवर्गातील असल्याने पालकांनी त्याला शाळेत ने-आण करण्यासाठी एका खासगी बसची सोय केली होती. १७ फेब्रुवारी रोजी शाळा सुटल्यानंतर हे बालक बसपर्यंत पोहोचण्यास थोडा उशीर झाला. याचा राग मनात धरून बसचालक कासीम याने संताप व्यक्त केला. तुला यायला इतका वेळ का लागतो? असे म्हणत त्याने या निष्पाप बालकाच्या डोक्यात बुक्के मारले आणि थोबाडीत लगावली. चालक कासीम एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने बसमधील इतर विद्यार्थ्यांनाही त्या बालकाला मारहाण करण्यास सांगितले.
मारहाणीनंतर बालक दहशतीत : या प्रकारामुळे ९ वर्षांचा तो चिमुरडा प्रचंड हादरून गेला असून, गेल्या आठ दिवसांपासून तो कमालीच्या दहशतीखाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे बसमध्ये महिला केअर टेकर उपलब्ध असूनही चालकाची मुजोरी सुरूच होती. यापूर्वीही मुलाला लघुशंकेला जावे लागल्यास हा चालक गाडी थांबवण्यास नकार देऊन मुलाचा छळ करत असल्याचे पालकांनी सांगितले.
चालकाची पालकांशीही अरेरावी: घटनेनंतर घाबरलेल्या मुलाने घरी जाऊन पालकांना हा सर्व प्रकार सांगितला. पीडित मुलाच्या वडिलांनी चालक कासीमला जाब विचारला, तेव्हा त्याने माफी मागण्याऐवजी पालकांशीच हुज्जत घातली. सुरुवातीला पालकांनी सामंजस्याने घेत पोलिसांत केवळ तक्रार अर्ज दिला होता. चालकाला आपल्या चुकीची जाणीव होईल, अशी पालकांना अपेक्षा होती; मात्र कासीमने उलट पालकांनाच अरेरावीची भाषा वापरून धमकावले. पालकांनी या प्रकाराबाबत शाळा प्रशासनाकडेही धाव घेतली होती. मात्र बस खासगी असल्याचे कारण पुढे करत शाळा प्रशासनाने या गंभीर प्रकरणातून आपले हात झटकले. एका विशेष बालकासोबत घडलेल्या या क्रूर कृत्यामुळे पालकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.