छत्रपती संभाजीनगर : रजिस्ट्री विभागाच्या बीड बायपास येथील दोन्ही कार्यालयांवर आतापर्यंत औरंगाबादचेच फलक कायम होते. याबाबत दै. पुढारीने सोमवारच्या अंकात सविस्तर वृत्त प्रकाशित केले. त्यानंतर जागे झालेल्या रजिस्ट्रीच्या अधिकाऱ्यांनी हे फलक उतरून घेतले आहेत.
शासनाने दोन वर्षांपूर्वी औरंगाबाद शहराचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर केले. त्यानंतर सर्व शासकीय कार्यालयांनी आपापल्या कार्यालयांवरी पाट्या बदलल्या. कार्यालयीन कामकाजातही औरंगाबाद ऐवजी छत्रपती संभाजीनगर असा वापर सुरू केला. परंतु शहरातील बीड बायपास येथील सह दुय्यम निबंधक यांच्या कार्यालय क्रमांक - ३ आणि कार्यालय क्रमांक ६ ने आतापर्यंत आपल्या कार्यालयातील औरंगाबादचे फलक उतरविले नव्हते. दोन वर्षांपासून अधिकारी-कर्मचाऱ्यांचे त्याकडे दुर्लक्ष होते. दै. पुढारीने रजिस्ट्री विभागाला संभाजीनगरचे वावडे या मथळ्याखाली छायाचित्रासह वृत्त प्रसिद्ध केले. त्यानंतर रजिस्ट्री विभागाच्या अधिकाऱ्यांनी हे दोन्ही फलक काढून घेतले. आता त्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर, असा उल्लेख असलेले नवीन फलक लावले जाणार आहेत. शहरात रजिस्ट्री कार्यालयाचे एकूण पाच कार्यालये आहेत. त्यातील तीन कार्यालये ही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागील बाजूस आहेत. तर दोन कार्यालये ही बीड बायपास येथे आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागील भागातील कार्यालयांनी दोन वर्षांपूर्वी शहराचे नामांतर होताच आपल्या कार्यालयांवरील जुने फलक काढून नवीन फलक लावले होते.