Sambhajinagar News: Out of 115 Statues in the City, Only 53 Are Authorized
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरातील २९ प्रभागातील ११५ वॉर्डामध्ये तब्बल ११५ पुतळे आहेत. त्यातील ५३ पुतळे अधिकृत असून, ५१ पुतळे अधिकृत की, अनधिकृत याबाबत प्रशासनाकडे कुठलीच माहिती उपलब्ध नाही. यात सर्वाधिक २१ पुतळे झोन ६ मध्ये आहेत. असे असतानाही नगरसेवकांकडून मागील दोन महिन्यांत पुतळे उभारण्याबाबतचेच बहुतांश प्रस्ताव सर्वसाधारण सभेत सादर होत आहेत.
राज्यात कोरोना महामारीमुळे रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तब्बल सहा वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर जानेवारी महिन्यात पार पडल्या. ११५ नगरसेवक निवडून आले. हे नगर-सेवक २९ प्रभागांमध्ये विभागले गेले आहेत. महापौर निवडीनंतर आतापर्यंत या नगरसेवकांची तीनवेळा सर्वसाधारण सभा झाली.
यातील दोन सर्वसाधारण सभेमध्ये पुतळा बसवण्याचे, चौकाचे नामकरण करण्याचे, रस्त्याचे नामकरण करण्याचे प्रस्तावच अधिक होते. मे महिन्याच्या सर्वसाधारण सभेच्या विषय पत्रिकेवर ४३ विषय होते. त्यातील सुमारे २० विषय चौक-रस्त्यांच्या नामकरणाचे होते. त्यासोबतच पुतळे उभारणीबाबतचेही प्रस्ताव विषयपत्रिकेत होते. विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागल्यामुळे केवळ राष्ट्रगीत म्हणून सर्वसाधारण सभा स्थगित करण्यात आली.
दरम्यान, सर्व साधारण सभेमध्ये पुतळा आणि नामकरणाचे विषय मोठ्या प्रमाणावर नगरसेवकांकडून मांडले जात आहे. महालिकेच्या शहर अभियंता विभागातर्फे झोननिहाय पुतळ्यांचे सर्वेक्षण करण्यात आल्याची माहिती मिळाली.
या माहितीचा अभ्यास केला असता शहरासाठी महापालिकेने केलेल्या १० झोन मध्ये ११५ पुतळे असल्याचे स्पष्ट झाले. त्यापैकी ५३ पुतळे अधिकृत असल्याचे महापालिकेने आपल्या टिप्पणीत म्हटले आहे. ५१ पुतळ्यांबद्दल महापालिकेकडे कोणतीच माहिती नाही. हे पुतळे अधिकृत आहेत की अनधिकृत आहेत या बद्दलचे कोण-तेही मत महापालिकेच्या यंत्रणेने नोंदवलेले नाही, परंतु हे पुतळे शहराच्या विविध भागात उभे आहेत. ११ पुतळे अनधिकृत असल्याची नोंद महापालिकेच्या यंत्रणेने केली आहे.