Sambhajinagar News : General approval on Aadhaar standard student number on 30th September
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणामुळे प्रत्येक उपाय फुंकून फुंकून केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाच्या संचमान्यतेच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने शाळांच्या माहितीबाबत कडक भूमिका घेतली आहे. यू-डायस आणि सरल पोर्टलवरील माहिती अचूक, अद्ययावत आणि एकसमान ठेवण्याचे निर्देश शिक्षण विभागाने दिले असून, संबंधित माहिती १६ सप्टेंबर २०२६ पूर्वी अपडेट करण्याची कार्यवाही करण्यास सांगण्यात आले आहे.
सन २०२५-२६ ची संचमान्यता यू-डायस व सरल पोर्टलवरील माहितीच्या आधारे शासन निर्णय १४ मार्च २०२४ तसेच शासन स्तरावरून वेळोवेळी प्राप्त निर्देशांनुसार शिक्षणाधिकारी यांच्या लॉगिनला उपलब्ध करून देण्यात आली आहे.
आता सन २०२६-२७ ची शैक्षणिक संचमान्यता दि. १५ मार्च २०२४ च्या सुधारित संचमान्यता निकषांनुसार करण्यात येणार आहे. यानुसार यू-डायस पोर्टलवर नोंद असलेल्या ३० सप्टेंबर २०२६ रोजीच्या पटावरील आधारप्रमाणित विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार संचमान्यतेची माहिती शिक्षणाधिकारी यांच्या लॉगिनला उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
त्यामुळे त्यापूर्वी विद्यार्थी व शाळांची माहिती अचूक असणे महत्त्वाचे आहे. संचमान्यतेच्या अनुषंगाने शाळा, तुकडी, माध्यम, शाळा व्यवस्थापनाचा प्रकार, कार्यरत पदे, विद्यार्थी तपशील, विद्यार्थी आधार प्रमाणीकरण तसेच इतर आवश्यक माहिती यू-डायस व सरल पोर्टलवर अद्ययावत करणे आवश्यक आहे.
सन २०२६-२७ मधील विद्यार्थी तपशील व दोन्ही पोर्टलवरील माहिती क्षेत्रीय स्तरावरील यंत्रणेच्या सहकार्याने १६ सप्टेंबरपूर्वी अपडेट करण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश शिक्षण संचालक शरद गोसावी आणि डॉ. महेश पालकर यांनी दिले आहेत.