Sambhajinagar News: Criticism of Sunetra Pawar is an insult to entire women leadership: Swati Kolhe
कन्नड, पुढारी वृत्तसेवा : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर काँग्रेस पक्षाकडून करण्यात आलेली टीका ही केवळ एका महिला नेत्या विरोधातील नसून संपूर्ण महिला नेतृत्वाचा अपमान आहे. अशा प्रकारची भाषा आणि राजकारण महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकीय परंपरेला शोभणारे नाही असे म्हणत राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा स्वाती कोल्हे यांनी निषेध व्यक्त केला आहे.
सोशल मीडियावर प्रसारित केलेल्या व्हिडिओ द्वारे स्वाती कोल्हे म्हणाल्या की, राजकीय मतभेद असू शकतात; मात्र महिलांबाबत अवमानकारक वक्तव्य करून त्यांचा अपमान करणे कोणत्याही परिस्थितीत योग्य नाही. महिला नेतृत्वाचा सन्मान राखणे ही प्रत्येक राजकीय पक्षाची नैतिक जबाबदारी आहे.
स्व. पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावरही त्यांच्या कार्यकाळात अशाच प्रकारच्या टीका करण्यात आल्या होत्या. मात्र त्या कोणत्याही टीकेला न घाबरता खंबीरपणे देशाचे नेतृत्व करत राहिल्या आणि देशाच्या सक्षम पंतप्रधान म्हणून त्यांनी इतिहासात अढळ स्थान निर्माण केले, असेही कोल्हे यांनी नमूद केले.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यादेखील अशा टीकेला न जुमानता जनतेच्या हितासाठी कार्यरत राहतील. त्यांच्या नेतृत्वक्षमतेवर जनतेचा विश्वास असून भविष्यात त्या केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचेही नेतृत्व करण्याची त्यांच्यात क्षमता असल्याचा विश्वास स्वाती कोल्हे यांनी व्यक्त केला. विकासाच्या मुद्द्यावर राजकारण करावे, अशी म्हणत काँग्रेस पक्षाने संबंधित वक्तव्याबाबत जाहीर माफी मागावी, अशीही मागणी केली.