Sambhajinagar News : Arch in Jijau Chowk named after Jijau or Minister Shirsat?
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: ज्यांच्या प्रेरणेने आणि संस्कारांतून हिंदवी स्वराज्य उभे राहिले, त्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या नावाने जालना रस्त्यावरील जिजाऊ चौकात नव्याने उभारण्यात येणाऱ्या कमानीवर चक्क त्यांच्या नावासमोर 'संकल्पना : संजय शिरसाट' असा पालकमंत्र्यांचा ठळक उल्लेख केल्याने शिवप्रेमींमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. 'कमान जिजाऊंच्या नावाची की मंत्री शिरसाटांच्या?' असा संतप्त सवालही शिवप्रेमींकडून उपस्थित केला जात आहे.
शेकडो शिवप्रेमींच्या लढ्यानंतर केंब्रिज चौकाला जिजाऊंचे नाव देण्यात आले. येथे भव्य कमान उभारण्याची जुनी मागणीही शिवप्रेमींची होती. त्यानुसार सरकारी निधीतून कमानीचे काम सुरू झाले. मात्र, काम अंतिम टप्प्यात असताना त्यावर जिजाऊंच्या नावासमोर पालकमंत्री शिरसाट यांच्या नावे लावण्यात आले. या प्रकारामुळे नागरिक व शिवप्रेमींमधून तीव्र आक्षेप घेतला जात आहे.
शिवछत्रपतींनी शेकडो गड-किल्ले जिंकूनही स्वतःच्या नावाचा मोह धरला नाही; मग जनतेच्या कररूपी पैशातून उभारल्या जाणाऱ्या वास्तूंवर आजच्या लोकप्रतिनिधींना स्वतःचे नाव कोरण्याचा अट्टाहास का, असा रोखठोक सवाल शिवप्रेमी विचारत आहेत. जर श्रेय घ्यायचेच होते, तर कोनशिलेवर नामोल्लेख करता आला असता; थेट मुख्य कमानीवरच असा उल्लेख करणे हा जिजाऊंच्या कार्यकर्तृत्वाचा अवमान आहे.
दरम्यान हा नामोल्लेख कोणत्या शासकीय नियमानुसार करण्यात आला, याचा प्रशासनाने तातडीने खुलासा करावा आणि कमानीवरून पालकमंत्र्यांचे नाव त्वरित हटवून केवळ 'राजमाता जिजाऊ माँसाहेब' यांचेच नाव ठळकपणे ठेवावे, अशी मागणी शिवप्रेमींनी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
जिजाऊ प्रवेशद्वारासाठी मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आम्ही सुरुवातीपासून लढा दिला. मंत्री संजय शिरसाट यांनी पुढाकार घेत निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे आभार. मात्र, हे प्रवेशद्वार कोणत्याही व्यक्तीच्या प्रसिद्धीसाठी नसून राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या नावाने आणि सन्मानार्थ उमे राहत आहे.- आत्माराम शिंदे, शिवप्रेमी
कमानीचे काम सरकारी निधी म्हणजेच सर्वसामान्य जनतेच्या पैशातून झाले आहे. त्यावर पालकमंत्र्यांनी स्वतःचे नाव देणे योग्य नाही. आम्ही शिवप्रेमी मिळून सरकारला या कामाचा खर्च देतो; मात्र कमानीवरील पालकमंत्र्यांचे नाव हटविले पाहिजे. अन्यथा धर्मवीर छावा संघटनेच्या वतीने पालकमंत्र्यांच्या घरासमोर मोठे आंदोलन करण्यात येईल.गणेश उगले, संस्थापक अध्यक्ष, धर्मवीर छावा संघटना
तमाम शिवप्रेमीसाठी आदरणीय असलेल्या राजमाता जिजाऊंच्या नावाच्या कमानीवर पालकमंत्री स्वतःच्या नावाची 'संकल्पना' लिहून काय सिद्ध करत आहेत. हे चुकीच आहे, याला आमचा कडाडून विरोध आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांचे नाव काढण्यात यावे, अन्यथा मोठे आंदोलन उभा करू.- सुनील कोटकर, संस्थापक धर्मयोद्धा संघटना
केंब्रिज चौकाचे नाव 'जिजाऊ चौक' व्हावे, यासाठी आमचा अनेक दिवसांपासून लढा सुरू आहे. त्यासाठीचा पाठपुरावा अनेक शिवप्रेमींनी केला आहे. यासाठी शासकीय स्तरावर पालकमंत्र्यांनी पुढाकार घेऊन सहकार्य केले. मात्र प्रवेशद्वारावर कोणत्याही व्यक्तीचे नाव न देता केवळ 'माँसाहेब जिजाऊ' यांचेच नाव असावे.-अॅड. सुवर्णा मोहिते, शिवप्रेमी तथा समन्वयक, मराठा क्रांती मोर्चा
जिजाऊ चौकाचे नामकरण व्हावे, यासाठी अनेक संघटना आणि सकल शिवप्रेमींनी आंदोलने केली. त्यांच्या मेहनतीने येथे माँसाहेब जिजाऊ यांच्या नावाने महाप्रवेशद्वार उभारण्याची संकल्पना पुढे आली. त्यामुळे पालकमंत्र्यांनी प्रवेशद्वाराला स्वतःचे नाव देणे निषेधार्ह आहे. शिवप्रेमी म्हणून मी याचा जाहीर निषेध करते.- रेखा वाहटुळे, शिवप्रेमी तथा मराठा क्रांती मोर्चा समन्वयक
राष्ट्रमाता जिजाऊ या कोणत्याही व्यक्ती, पक्ष किंवा पदाच्या मालकीच्या नसून महाराष्ट्राच्या अस्मितेचा वारसा आहेत. त्यांच्या नावाने उभारलेल्या कमानीवर विद्यमान राजकीय पदाधिकाऱ्याचे नाव देण्याऐवजी केवळ जिजाऊंच्या कार्याचा आणि विचारांचा गौरव व्हावा. या वैयक्तिक नावाऐवजी प्रशासनाने 'राष्ट्रमाता जिजाऊ' यांच्या नावाला सन्मान द्यावा.- डॉ. दिव्या पाटील, शिवप्रेमी