छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जेसीबीने खोदाई करत असताना बाजूचे झाड तुटू नये, हे सांगण्यासाठी गेलेल्या ५५ वर्षीय किराणा दुकानदाराला जेसीबीच्या फावड्याचा जोरदार फटका बसला. अतिरक्तस्रावामुळे त्यांचा दुर्दैवी अंत झाला. संजय पंढरीनाथ चौधरी (५५, रा. स्वराजनगर, हनुमान मंदिराजवळ) असे या मृत दुकानदाराचे नाव आहे. ही घटना रविवारी (दि.१२) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास मुकुंदवाडी परिसरातील स्वराजनगर येथे घडली. शहरात सुरू असलेल्या रस्ते विकासाच्या कामात कंत्राटदार आणि जेसीबी चालकाच्या बेदरकारपणाचा एका निष्पाप नागरिकाला बळी गेल्याची चर्चा सुरू आहे.
दरम्यान, पोलिसांनी जेसीबी (क्र. एमएच २० सीएच ७६४२) चालक अनिल लक्ष्मण राठोड (४६, रा. कामगार गल्ली, चिकलठाणा) याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला बेड्या ठोकल्या आहेत, अशी माहिती निरीक्षक विवेक सोनवणे यांनी दिली.
मृताचा मुलगा दत्ता चौधरी याने दिलेल्या फिर्यादीनुसार, संजय चौधरी यांचे स्वराजनगर येथे घरगुती किराणा दुकान आहे. रविवारी दुपारी त्यांच्या दुकानासमोरच रस्त्याचे काम सुरू होते. यावेळी जेसीबीने खोदाई सुरू असताना बाजूला असलेले एक झाड तुटत असल्याचे संजय यांच्या निदर्शनास आले. हे झाड तुटू नये, हे सांगण्यासाठी ते तात्काळ जेसीबी चालकाकडे गेले. मात्र मशीनच्या प्रचंड आवाजामुळे चालकाला संजय यांचा आवाज ऐकू आला नाही.
त्याच वेळी चालकाने निष्काळजीपणे जेसीबी वळवल्याने त्याचे लोखंडी फावडे थेट संजय यांच्या डाव्या पायाला जोरात धडकले. या धडकेत त्यांच्या पायाला मोठी जखम होऊन रक्ताची चिळकांडी उडाली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या संजय यांना शेजारी रवी पेरे यांनी तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले, मात्र दुपारी १:५५ च्या सुमारास डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.
अपघात घडल्यानंतर गुन्हा दाखल करत असताना जेसीबी चालकाने चक्क पोलिसांनाच खोटे नाव सांगून चकवण्याचा प्रयत्न केला. त्याने सुरुवातीला स्वतःचे नाव 'सचिन' तर वय केवळ '२६ वर्षे' असल्याचे सांगितले. मात्र, त्याचे प्रत्यक्ष वय अधिक असल्याचा संशय आल्याने पोलिसांनी त्याला 'खाक्या दाखवला. पोलिसी हिसका बसताच त्याने आपले खरे नाव अनिल राठोड असल्याचे व वय ४६ वर्षे असल्याची कबुली दिली.
...तर जीव वाचला असता
स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, या भागातील रस्त्याचे काम गेल्या ५ वर्षांपासून रखडलेले होते. आता कुठे या कामाला मुहूर्त लागला होता. मात्र कामाच्या ठिकाणी कंत्राटदाराने सुरक्षेचा कोणताही उपाय योजला नव्हता. यामुळे नागरिक व कंत्राटदार यांच्यात सातत्याने खटके उडत होते. अवजड मशिनरीने काम सुरू असताना मालमत्तेचे नुकसान टाळण्यासाठी किंवा नागरिकांना सावध करण्यासाठी तिथे एका कर्मचाऱ्याची नियुक्ती असणे आवश्यक होते. तशी व्यवस्था असती तर आज चौधरी यांचा जीव वाचला असता, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत.