Sambhajinagar News : जिल्ह्यात ३० टक्के अतिरिक्त इंधन पुरवठा file photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : जिल्ह्यात ३० टक्के अतिरिक्त इंधन पुरवठा

शांतता व संयम राखण्याचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

Sambhajinagar News: 30% Additional Fuel Supply in the District

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील विविध पेट्रोल पंपांवर इंधन खरेदीसाठी नागरिकांनी विनाकारण गर्दी (पॅनिक बायिंग) केल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत असून, नागरिकांनी शांतता व संयम राखावा, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी केले आहे. जिल्ह्यातील पंपांवर नियमित मागणीपेक्षा ३० टक्क्यांहून अधिक अतिरिक्त पुरवठा उपलब्ध करून देण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.

काही दिवसांपासून शहर आणि जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवर इंधन भरण्यासाठी वाहनधारकांच्या रांगा लागत आहेत. त्यामुळे अनेक पंपांवरील साठा संपून तिथे नो स्टॉकचे बोर्ड झळकत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जिल्हयात मुबलक साठा असल्याचा दावा केला आहे. जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा कोणताही तुटवडा नाही. नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून जिल्ह्यातील तेल कंपन्यांच्या डेपोमधून सर्व पेट्रोल पंपांवर नियमित मागणीपेक्षा ३० टक्क्यांहून अधिक अतिरिक्त पुरवठा उपलब्ध करून देण्यात आला आहे.

इंधनाचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध असून, पुरवठा साखळी पूर्णपणे सुरक्षित आहे. सोशल मीडिया (व्हॉट्सअॅप, फेसबुक इ.) वर इंधन टंचाई किंवा वाहतूक बंद असल्याबाबतचे जे मेसेज फिरत आहेत, ते अपूर्ण माहितीवर आधारित, तसेच चुकीचे आणि दिशाभूल करणारे आहेत. नागरिकांनी अशा कोणत्याही अफवांना बळी पडू नये, तसेच असे संदेश फॉरवर्ड करू नयेत, असेही जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.

विनाकारण साठा करू नका

नागरिकांनी भीतीपोटी गाड्यांच्या टाक्या फुल करणे किंवा कॅनब्यांमध्ये इंधनाचा साठा करणे पूर्णपणे थांबवावे. एकाच वेळी सर्वांनी पंपांवर गर्दी केल्याने शहरातील मुख्य रस्त्यांवर वाहतुकीचा खोळंबा होत असून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. या गर्दीमुळे रुग्णवाहिका आणि इतर अत्यावश्यक सेवांच्या वाहनांना अडथळा निर्माण होऊ शकतो, याचे भान सर्वांनी ठेवावे. सोशल मीडियावरून चुकीची माहिती किंवा अफवा पसरवणाऱ्यांवर प्रशासन सायबर कायद्यांतर्गत कायदेशीर कारवाई करेल, असा इशारा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिला आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT