Sambhajinagar Municipal Corporation Ranks First in Census
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा शहरात गेल्या आठवड्यापर्यंत जनगणनेचे काम केवळ ३० टक्के भागातच सुरू होते. परंतु अधिकारी-कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन समस्या जाणून घेत कामाची गती वाढविण्याच्या सूचना केल्यानंतर आठवडाभरात छत्रपती संभाजीनगर महापालिका जनगणनेच्या कामात राज्यात प्रथम क्रमांकावर असून, शहरातील ९५ टक्के भागात हे काम सुरू झाले आहे, अशी माहिती बुधवारी (दि. २७) आयुक्त अमोल येडगे यांनी दिली. त्यासोबतच येत्या ५ जूनपर्यंत हे काम पूर्ण होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
शासन आदेशानुसार महापालिकेने शहरात जनगणनेच्या कामाला सुरुवात केली आहे. यासाठी केंद्र शासनाने १ मेपासून देशभर जनगणनेचे काम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शहरात १ ते १५ मेपर्यंत नागरिकांनी स्वतः अॅपवर जाऊन माहिती भरली. या स्वगणनेनंतर आता १६ मेपासून प्रत्यक्षात घरोघरी जाऊन घर गणनेच्या कामाला सुरुवात झाली आहे.
शहरात महापालिकेचे या कामासाठी ब्लॉक तयार केले आहेत. प्रत्येक ब्लॉकमध्ये सुमारे एका कर्मचाऱ्यांकडे २०० घरांचा परिसर दिला आहे. त्यानुसार काम सुरू झाले. परंतु, पहिल्या आठवड्यात कामाची गती अतिशय धिमी होती. त्याबाबत माहिती देताना आयुक्त येडगे म्हणाले की, राज्यात पहिल्या आठवड्यात छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे ३० टक्के भागातच काम सुरू झाले होते.
हा प्रकार लक्षात आल्याने सर्व जनगणनेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची रविवारी मौलाना आझाद संशोधन केंद्रात एक बैठक घेतली. त्यात राष्ट्रीय कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. काम सुरु न करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जातील, असा इशाराही त्यांनी दिला. त्यानंतर प्रत्येक कर्मचाऱ्यांनी आता कामाची गती वाढविली आहे, असे म्हणत आयुक्त येडगे यांनी सांगितले की, सध्या जनगणनेच्या कामात छत्रपती संभाजीनगर महापालिका प्रथम क्रमांकावर आहे. शहरात ९५ टक्के भागात हे काम सुरू आहे.
त्यामुळे आता येत्या ५ जूनपर्यंत महापालिका हद्दीतील जनगणनेचे काम पूर्ण होईल, असेही ते म्हणाले. हालगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई अटळजनगणनेच्या कामात हालगर्जीपणा करणाऱ्यांना नोटीस बजावल्या आहेत. आता त्यांनी दिलेल्या खुलाशातील कारणांची तपासणी केली जात आहे. आरोग्यविषयी गांभीर स्वरुपाच्या प्रकरणांमध्ये सूट दिली जाणार आहे. परंतु, कारणे समाधानकारक नसेल तर कारवाई अटळ आहे, असे आयुक्तांनी सांगितले.
चांगल्या कामाचा गौरवअनेक कर्मचाऱ्यांनी दिलेले काम आठवडाभरातच पूर्ण केले आहेत. काहींनी २०० वर घरांचे काम पूर्ण केले आहेत. त्यासर्वाच्या कामाचा गौरवही केला आहे, असेही आयुक्तांनी सांगितले.