Sambhajinagar municipal tax hike AI Image
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar municipal tax hike : मनपा शहरवासीयांना देणार करवाढीचा चटका; आजच्या मनपा सभेत येणार प्रस्ताव

अगोदरच गॅस, इंधन दरवाढीमुळे नागरिक त्रस्त आहेत. त्यात पुन्हा करवाढीचा चटका देण्याची तयारी महापालिका प्रशासनाने केली आहे.

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : महापालिका शहरातील सर्वच मालमत्तांचे नव्याने सर्वेक्षण करून नव्या दराने म्हणजेच कॅपिटल बेस अथवा रेडरिकनर दानुसार कर आकारणी करणार आहे. त्यासाठी खासगी एजन्सीची नियुक्ती केली जाणार असून, यासंदर्भात आजच्या सर्वसाधारण सभेत प्रशासनाकडून प्रस्ताव मंजुरीस्तव सादर केला जाणार आहे. परंतु, अगोदरच गॅस, इंधन दरवाढीमुळे नागरिक त्रस्त आहेत. त्यात पुन्हा करवाढीचा चटका देण्याची तयारी महापालिका प्रशासनाने केली आहे.

महापालिकेच्या रेकॉर्डवर सध्या ३ लाख २५ हजार एवढ्या मालमत्तांची नोंद आहे. या मालमत्तांना दरवर्षी महापालिका कर वसुलीसाठी डीमांड नोटीस पाठवते. त्यातील दरवर्षी ३० टक्के मालमतीधारकांकडूनच कर वसुली करण्यात महापालिकेला यश येते. गतवर्षी महापालिकेने दोनवेळा मालमत्ता कराच्या शास्तीमध्ये सवलत दिली होती. त्यामुळे कर वसुलीची टक्केवारीमध्ये वाढ होऊन आतापर्यंतची सर्वधिक वसुली ठरली.

महापालिकेच्या आजपर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच कर वसुलीची आकडेवारी २०० कोटीपार गेली होती. त्यामुळे यंदाही महापालिकेने एप्रिलच्या पहिल्या दिवसापासूनच कर वसुलीवर भर दिला आहे. प्रशासनाने प्रत्येक मालमत्ताधारकांकडून सक्तीने कर वसुली करणे आवश्यक आहे.

दरम्यान, राज्यात ज्या महापालिकांनी नव्याने कॅपिटल बेसवर आधारित कर आकारणी केली. त्या महापालिकांची कर वसुली वाढल्याची माहिती प्रशासनाला मिळाली. त्यावरून इतर महापालिकांनी अवलंबलेल्या आकारणीची पद्धत जाणून घेण्यासाठी संभाजीनगर महापालिकेने अधिकाऱ्यांना त्या त्या महापालिकांच्या दौऱ्यावर पाठविले होते. यात कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली या महापालिकांचा समावेश असून, या महापालिकांची कर वसुली छत्रपती संभाजीनगरपेक्षा जास्त आहे, असा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

प्रत्यक्षात कर वसुली शंभर टक्के होत नाही, म्हणून महापालिकेने कराच्या दरामध्ये वाढ करून नव्याने कर आकरणीचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी प्रस्तावही महापालिकेच्या आजच्या सभेपुढे मंजुरीस्तव सादर केला आहे. यामुळे कर वसुली वाढण्याऐवजी शहरवासीयांना आणखी एक महागाईचा चटका बसणार, है निश्चित आहे.

कर भरणारे सव्वालाखच

शहरात ३ लाख २५ हजारांहून अधिक मालमत्ताधारक आहेत. त्यापैकी दरवर्षी १ ते १ लाख २५ हजारांच्या जवळपास मालमताधारकय नियमितपणे कर भरणा करतात. शिवाय, ३० ते ३५ हजार मालमत्ताधारक असे आहेत की, जे सवलत मिळते का, याचीच प्रतीक्षा करतात. तेव्हा करवाढ झाल्यानंतर कर भरणा करणाऱ्यांची संख्या वाढणार की कमी होणार, हे सांगणे अशक्य आहे.

वसुलीची रक्कम वाढेल

नव्याने सर्वेक्षण केल्यानंतर नव्या मालमत्ता कर आकारणीच्या फेल्यात येतील, एवढाच फायदा होणार आहे. शिवाय, ज्या भागात जुन्या मालमांना आजही जुन्या दराने कर आकारणी होते, त्यात वाढ होणार आहे. परंतु नव्या दराने कर आकारणी केल्यानंतर कर भरणा करणाऱ्यांची संख्या वाढणार नाही, तर ती तेवढीच म्हणजेच सव्वालाखाच राहणार आहे, परंतु वसुलीची रक्कम अर्थात जेथे १५० कोटी कर वसुली होते, तेथे दरवाढीमुळे २०० कोटी वसूल होतील. त्यामुळे दरवाढीचा चटका हा नियमित कर भरणा करणाऱ्यांनाच बसणार, हे निश्चित आहे.

ड्रोनद्वारेही सर्वेक्षण

शहरातील प्रत्येक मालमत्तांना पीआर कार्ड देण्यासाठी नगरभूमापन विभागाच्या वतीने डोणद्वारे सर्वेक्षण केले जाणार आहे. असे असतांनाही महापालिका प्रशासनाने शहरातील मालमत्तांचे खाजगी संस्थेकडून नव्याने कर आकारणीसाठी मालमत्तांचे सर्वेक्षण करण्याचा घाट घातला असून एकाच प्रकारच्या सर्वेक्षणावर कोटडवीची उधळपट्टी होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT