छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या शिक्षण विभागांतर्गत सुरू असलेल्या मराठी व उर्दू माध्यमाच्या १०० बालवाडी वर्गातील शिक्षिका आणि पाच सेविकांना पुन्हा मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे. सभापती अनिल मकरिये यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि. ४) होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत या प्रस्तावावर निर्णय होणार आहे.
महापालिकेच्या विविध शाळांमध्ये बालवाडी वर्गासाठी १०० शिक्षिकांची दरमहा १२ हजार ५०० रुपये मानधनावर, तर पाच बालवाडी सेविकांची दरमहा ७ हजार ५०० रुपये मानधनावर निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्यात आली आहे. संबंधित शिक्षिका व सेविकांना वेळोवेळी आदेश काढून विविध शाळांवर नेमणूक देण्यात आली होती. त्यांच्या कार्यादेशाची मुदत ३० एप्रिल २०२६ रोजी संपली आहे.
दरम्यान, शासनाच्या २ फेब्रुवारी २०२३ रोजीच्या निर्णयानुसार बालवाडी शिक्षिका व सेविकांचे जन्मतारखेनुसार वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर सेवा समाप्त करण्याची तरतूद आहे. त्यामुळे या अटीच्या अधीन राहून १०० शिक्षिका आणि पाच सेविकांना प्रथम सत्रासाठी मुदतवाढ देण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.
विद्यार्थीसंख्या घटलेल्या बालवाड्यांकडे लक्ष
बालवाडी वर्गातील विद्यार्थीसंख्येचाही प्रस्तावात विचार करण्यात आला आहे. ज्या ठिकाणी विद्यार्थीसंख्या घटली आहे, तेथील बालवाडी शिक्षिकांचे आवश्यकतेनुसार इतर बालवाडी किंवा शाळांमध्ये समायोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे केवळ मुदतवाढ न देता उपलब्ध मनुष्यबळाचा गरजेनुसार वापर करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे.