MNS : जिल्ह्यात मनसे 'नेतृत्वहीन', उरले-सुरले मनसैनिकही सैरभैर ! (Pudhari File Photo)
छत्रपती संभाजीनगर

MNS : जिल्ह्यात मनसे 'नेतृत्वहीन', उरले-सुरले मनसैनिकही सैरभैर !

छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सोडचिठ्ठी दिल्याने जिल्ह्यात मनसेची पुरती वाताहत झाली आहे.

पुढारी वृत्तसेवा

Sambhajinagar MNS 'leaderless' in the district

राहुल जांगडे

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सोडचिठ्ठी दिल्याने जिल्ह्यात मनसेची पुरती वाताहत झाली आहे. तत्कालीन जिल्हाध्यक्ष आणि दोन्ही शहराध्यक्षांसह अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पक्षाला 'जय महाराष्ट्र' करत सोडचिठ्ठी दिली. त्यानतंर अनेक महिने उलटले तरी या प्रमुख पदांवर कोणाचीही नियुक्ती करण्यात पक्षश्रेष्ठींना अद्याप यश आलेले नाही. त्यामुळे जिल्ह्यात मनसेची अवस्था 'नेतृत्वहीन' झाली असून, इंजिनच भरकटल्याने उरले-सुरले मनसैनिकही अक्षरशः सैरभैर झाल्याची स्थिती आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या झंझावतामुळे राज्यातील तरुणाईमध्ये अद्यापही मोठी क्रेझ आहे, मात्र संभाजीनगर महापालिका निवडणूक न लढण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर झाल्याने जिल्ह्यातील नाराज पदाधिकाऱ्यांसह अनेक मनसैनिकांनी पक्षाला रामराम ठोकला. यात तत्कालीन जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर, शहराध्यक्ष आशीष सुरडकर, गजन गौडा पाटील यांनी एकापाठोपाठ पक्ष सोडला.

तेव्हापासून मनसेचे इंजिन भरकटले आहे. जनसामान्यांच्या प्रश्नांवरील मनसेची आंदोलने अक्षरशः ठप्प झाली आहेत. पक्ष वाढीसाठी, कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा भरण्यासाठी किंवा आगामी दिशा ठरवण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडून कोणतीही रणनीती किंवा मार्गदर्शक एजेंडा पुढे आणला गेलेला नाही. जिल्हाप्रमुख, शहरप्रमुखच नाहीत, मग कोणाचे आदेश पाळायचे आणि काय करायचे? वरिष्ठ पातळीवरून या मरगळीकडे कधी लक्ष दिले जाणार आहे, असा बिकट प्रश्न मनसैनिकांसमोर उभा आहे.

अनेक महिन्यांपासून प्रमुख पदे रिक्त, पक्षश्रेष्ठींकडून नियुक्त्या नाही

नवनिर्माणाचे स्वप्न कागदावर जिल्ह्यात मनसेच्या अस्तित्वाची लढाई सुरू

महाराष्ट्र नवनिर्माण सेना असून, इथले नवनिर्माणाचे स्वप्न अद्यापही कागदावरच आहे. सोशल मीडियापुरते उरलेल्या या पक्षात अशीच अनास्था सुरू राहिली, तर उरलेला मनसैनिकही पक्ष सोडण्यास फारसा वेळ लावणार नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. पक्षाला घरघर लागलेली असताना वरिष्ठ नेते यावर कधी फुंकर घालणार, असा सवाल पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या मनसैनिकांना सतावत आहे.

पक्ष उभारीसाठी धडपड

जिल्ह्यात मनसेशी एकनिष्ठ असलेले काही पदाधिकारी आजही पक्षाच्या उभारीसाठी धडपडत करत आहेत. यात जिल्हा संपर्क प्रमुख बिपीन नाईक, सतनामसिंग गुलाटी, अशोक पवार पाटील, राहुल पाटील यांच्यासह काही जण सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यांना पक्षश्रेष्ठींकडून आवश्यक विश्वास आणि पाठबळ मिळणेही तेवढेच आवश्यक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT