छत्रपती संभाजीनगर

संभाजीनगर : सुंदरवाडीतील कुंटणखान्याचा पर्दाफाश; तिघे गजआड, पाच पीडितांची सुटका

backup backup

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : नूतन उपविभागीय पोलिस अधिकारी पूजा नांगरे यांच्या पथकाने चिकलठाणा, सुंदरवाडी भागातील हॉटेल गॅलेक्सी येथे सुरु असलेल्या कुंटणखान्याचा पर्दाफाश केला. हॉटेलमालक, व्यवस्थापक आणि वेटर या तिघांना अटक करून बिहार, गुजरात, पश्चिम बंगाल राज्यातील पाच पीडितांची सुटका केली. आरोपींच्या ताब्यातून मोबाईल, कंडोम असा ७९ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. ५ फेब्रुवारीला रात्री ही कारवाई करण्यात आली.

हॉटेलमालक संदीप भिकाजी खाजेकर (वय २६ रा. सुंदरवाडी शिवार), व्यवस्थापक भावेष प्रविण जाधव वय २० रा. रामनगर, हर्सूल टी पॉइंट आणि जब्बार निजाम शेख (वय २६ रा. शिंगी, ता. गंगापूर), अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत, अशी माहिती पूजा नांगरे यांनी दिली. अधिक माहितीनुसार, सुंदरवाडी शिवारातील हॉटेल गॅलेक्सीमध्ये गेल्या काही महिन्यांपासून कुंटणखाना सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, नूतन उपविभागीय पोलिस अधिकारी पूजा नांगरे यांनी एएचटीयू पथकाच्या सहायक निरीक्षक आरती जाधव, अंमलदार कपील बनकर, मंजुषा हातकंगणे, सपना चरवंडे, ईशाद पठाण यांना सोबत घेत सापळा रचला.

डमी ग्राहकाने इशारा करताच कारवाई

कारवाईसाठी पोलिसांनी डमी ग्राहक पाठविला. त्याला खिडकीतून हात दाखविण्याचा इशारा करण्याचे सांगण्यात आले होते. हा ग्राहक हॉटेलमध्ये गेल्यावर प्रथक मालक संदीप खाजेकरला भेटला. त्याने व्यवस्थापक भावेश जाधव तुमची सर्व व्यवस्था करतील, असे सांगून वेटर जब्बार शेखसोबत जाधवकडे पाठविले. ग्राहक जाधवला भेटल्यावर त्याने काही क्षणाताच ग्राहकाला एका खोलीत थांबवत एका महिलेला घेऊन आला. त्यानंतर कुंटणखाना चालत असल्याची खात्री पटताच ग्राहकाने खिडकीतून पोलिस पथकाला हात दाखवून इशारा केला. पथकाने हॉटेलमध्ये छापा मारला. वेगवेगळ्या खोल्यांमध्ये असलेल्या पाच पीडितांची सुटका केली. आरोपींविरुद्ध चिकलठाण पोलिस ठाण्यात पिटा ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक मनिष कलवानिया, अपर अधीक्षक सुनील लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

पीडितांच्या अशिक्षितपणाचा गैरफायदा

पोलिसांनी पटना, सुरज, अहमदाबाद येथील प्रत्येकी एक आणि पश्चीम बंगालच्या दोन, अशा पाच पीडितांची सुटका केली. या पीडितांना हॉटेल कामाचे आमिष दाखवून येथे आणण्यात आले होते. त्यांच्या अशिक्षितपणाचा व आर्थीक परिस्थितीचा गैरफायदा घेत आरोपी त्यांच्याकडून देहव्यापार करुन घेत असल्याचे तपासात समोर आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT