theft Pudhari
छत्रपती संभाजीनगर

Robbery : चावी दारावरच ठेवणे पडले महागात; ४५ मिनिटांत चोरट्यांनी फ्लॅट फोडला

लॅपटॉप, चांदीच्या मूर्तीसह साडेसोळा हजारांचा ऐवज लंपास; उस्मानपुरा ठाण्यात गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

Sambhajinagar Keeping the key on the door was expensive; In 45 minutes, the thieves broke into the flat

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा घराला कुलूप लावून त्याची चावी दाराच्याच आडोशाला किंवा खिडकीत ठेवण्याची सवय अनेकांना असते. मात्र, हीच सवय उस्मानपुरा भागातील एका कुटुंबाला चांगलीच महागात पडली आहे. दरवाजाला अडकवून ठेवलेल्या चावीनेच कुलूप उघडून चोरट्यांनी अवघ्या ४५ मिनिटांत घरातून लॅपटॉप, चांदीची मूर्ती आणि रोख रक्कम असा साडेसोळा हजारांचा ऐवज लंपास केला. ही घटनाबुधवारी (दि. २६) सायंकाळी ६:१५ ते ६:५८ वाजेच्या दरम्यान उस्मानपुरा भागातील क्षेयनगर (झाबंड इस्टेट) येथील वशिष्ठ अपार्टमेंटमध्ये घडली.

फिर्यादी संतोष देविदासराव जोशी (५२, रा. फ्लॅट नं. ६, वशिष्ठ अपार्टमेंट, उस्मानपुरा) यांच्या तक्रारीनुसार, जोशी यांची मुलगी ही बुधवारी सायंकाळी ६:१५ वाजेच्या सुमारास क्लासला जाण्यासाठी निघाली. तिने घराला कुलूप लावले आणि त्याची चावी नेहमीप्रमाणे लोखंडी दरवाजाच्या आतून मुख्य दरवाजाला अडकवून ठेवली. त्यानंतर तिने लोखंडी दरवाजाला कडी लावली आणि ती निघून गेली. अवघ्या पाऊण तासानंतर, सायंकाळी ६:५८ वाजेच्या सुमारास जोशी यांची पत्नी हेमवती या घरी परतल्या.

त्यावेळी त्यांना घराचे दोन्ही दरवाजे उघडे दिसले आणि कुलूप बाहेर चपलांच्या स्टँडवर ठेवलेले आढळले. कोणीतरी दारावर ठेवलेल्या चावीनेच कुलूप उघडून घरात प्रवेश केल्याचे त्यांच्या लक्षात आले. हेमवती यांनी घाबरून घरात जाऊन पाहिले असता, चोरट्यांनी घरातील टेबलवर ठेवलेला लॅपटॉप, देवघरातील ६ तोळे वजनाची चांदीची गणपतीची मूर्ती आणि ५०० रुपये रोख असा ऐवज चोरून नेल्याचे उघडकीस आले.

संतोष जोशी हे बाहेरगावी असल्याने, त्यांनी त्यांच्या भावाला आणि भाच्याला तत्काळ पोलिस ठाण्यात पाठवून घटनेची माहिती दिली. पोलिसांनी लगेच घटनास्थळी येऊन पाहणी केली. त्यानंतर संतोष जोशी यांनी शनिवारी (दि. २९) ठाण्यात तक्रार नोंदवली. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक उपनिरीक्षक प्रभाकर करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT