डाव्याबाजूला नाल्यालगतच आरोपी राहत असलेले घर. दुसऱ्या छायाचित्रात घराच्या जवळच असे झुंडीने कुत्री बसलेली असतात. माणूस दिसताच थेट अंगावर धावून जातात. pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Rashidpura abortion case : मोबाईल डेटामधून 'त्या' पांढरपेशा डॉक्टरांची नावे उघड होणार !

रशीदपुरा गर्भपात रॅकेट प्रकरण : शहरासह ग्रामीण भागातही पाळेमुळे

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : शहरातील रशीदपुरा भागात उघडकीस आलेल्या बेकायदा गर्भपात प्रकरणाने खळबळ उडवून दिली आहे. हे केवळ एका गल्लीत चालणारे छोटे कृत्य नसून, शहर आणि ग्रामीण भागातील काही पांढरपेशा डॉक्टरांच्या संगनमताने चालणारे मृत्यूचे एक मोठे नेटवर्क असल्याची शक्यता पोलिस सूत्रांनी दिली आहे. मुख्य आरोपी शाहेदा परवीन हिच्या मोबाईलमध्ये सापडलेले विविध बड्या प्रसूतिगृहांचे सोनोग्राफी रिपोर्ट आणि डॉक्टरांच्या संपर्क क्रमांकांमुळे आता अनेक डॉक्टरांचे धाबे दणाणले आहेत.

या गुन्हेगारी साखळीचा मुख्य सूत्रधार आणि फरार एजंट मंगेश थोरात याने फुलंब्री, सिल्लोड आणि जालना जिल्ह्यातील बदनापूर या ग्रामीण भागात आपले जाळे विणले होते. ग्रामीण भागातील दवाखान्यांमध्ये येणाऱ्या आणि गर्भपात करू इच्छिणाऱ्या महिलांची माहिती काही डॉक्टर मंगेशला देत असत. धक्कादायक बाब म्हणजे पोर्टेबल सोनोग्राफी मशीन घेऊन थेट रुग्णांच्या घरी जाऊन लिंगनिदान करत होते.

या बेकायदा प्रक्रियेसाठी तब्बल ४५ ते ५० हजार रुपये उकळले जात. त्यानंतर मंगेश आणि त्याची पत्नी मीनाक्षी त्या महिलेला रशीदपुऱ्यात शाहेदाकडे आणत असत. शाहेदा गोळ्यांच्या माध्यमातून गर्भपात करण्यासाठी किमान १५ हजार रुपये उकळत होती, तर श्रीमंत कुटुंबातील महिलांकडून हा आकडा अधिक असायचा.

लॅब चालक संशयाच्या भोवऱ्यात

शाहेदा हिच्या मोबाईलमधील डेटा हे या तपासातील सर्वात मोठा तपासाचा धागा ठरणार आहे. यात सापडलेल्या सोनोग्राफी रिपोर्ट्सवरून, हे रिपोर्ट पाठवणारे आणि बेकायदेशीर सोनोग्राफी करणारे लॅब चालक आता संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

फ्लॅटजवळ नाल्याभोवती कुत्र्यांच्या घोळका

बुधवारी सिटी चौक पोलिस ठाण्याच्या निरीक्षक निर्मला परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज शिंदे यांच्या पथकाने शाहेदाच्या घराचा आणि अर्भकांची विल्हेवाट लावल्या जाणाऱ्या नाल्याच्या ठिकाणी जाऊन स्थळपंचनामा केला. पोलिसांनी संबंधित घरमालकाशी संपर्क साधून रेंट अॅग्रीमेंटची माहिती मागविली आहे. तसेच शाहेदाच्या पतीच्या खात्यावरून लाखो रुपयांचे संशयास्पद व्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या पैशाची वाटणी कुणाकुणाला झाली, याचा तपासही सुरू झाला आहे.

'त्या' दोन रॅकेटशी कनेक्शन ?

शहरात उघडकीस आलेले हे सलग तिसरे मोठे रॅकेट आहे. यापूर्वी खळबळ माजवणाऱ्या सतीश सोनवणे आणि टीव्हीसेंटर परिसरातील डॉ. राजपूत यांच्या रॅकेटशी शाहेदा व मंगेश थोरातच्या टोळीचे कनेक्शन असण्याची दाट शक्यता समोर आली आहे. हे सर्वजण एकाच मोठ्या आंतरजिल्हा साखळीचा भाग आहेत का? याचा कसून तपास पोलिस करत आहेत. शा-हेदाच्या मोबाईलमध्ये शहरातील जुन्या शहरातील अनेक गर्भवती महिलांचे क्रमांक आणि शहरातीलच प्रसूतिगृहांचे सोनोग्राफी रिपोर्ट सापडल्याने अनेक बडे डॉक्टर आणि औषध पुरवठादार पोलिसांच्या रडारवर आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT