मनी एक्सचेंज व्यावसायिकावर झालेला हल्ला परिसरातील सीसीटीव्हीत कैद झाला आहे. pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar Crime : मनी एक्सचेंज व्यावसायिकावर हल्ला

डोळ्यांत मिरचीपूड फेकून ५ लाखांची रोकड पळवली

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : डॉलर एक्सचेंज करण्याच्या बहाण्याने एका मनी एक्सचेंजरला बोलावून घेऊन त्यांच्या डोळ्यांत मिरची पावडर फेकत चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना विद्यानगर परिसरात घडली. या हल्ल्यात दुचाकीवरून आलेल्या तीन लुटारूंनी व्यावसायिकाकडील ५ लाख १७ हजार रुपयांची रोकड असलेली बॅग पळवली. बुधवारी (दि. २४) सायंकाळी हा थरार घडला असून या पूर्वनियोजित कटामुळे शहरात खळबळ उडाली आहे.

उस्मानपुरा भागातील शाह कॉलनीत राहणारे तेजपालसिंग सुंदरसिंग साहानी (५२) यांचा मनी एक्सचेंजचा व्यवसाय आहे. त्यांना एका ग्राहकाला ५५०० यूएस डॉलर तातडीने भारतीय चलनात बदलून हवे असल्याचे सांगण्यात आले.

त्यानुसार, साहानी ५ लाख १७ हजार रुपये घेऊन विद्यानगर येथील अभिनव स्वकल्प अपार्टमेंटसमोर पोहोचले. ते ग्राहकाची वाट पाहत असताना अचानक दोघांनी मागून येऊन त्यांच्या डोळ्यांत मिरचीपूड फेकली.

साहानी यांनी प्रतिकार केला असता, संतापलेल्या लुटारूंनी त्यांच्या मनगटावर चाकूने सलग चार-पाच वार केले आणि पैशांची बॅग हिसकावली. जखमी अवस्थेतही त्यांनी पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, मात्र हल्लेखोर दबा धरून बसलेल्या तिसऱ्या साथीदारासह दुचाकीवरून पसार झाले. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस सीसीटीव्ही फुटेज व मोबाईल कॉल डिटेल्सच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT