Sambhajinagar Groundwater level in the district has increased by 4 feet
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : दमदार पावसामुळे यंदा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील भूजल पातळीत सरासरी चार फुटांपेक्षा अधिक वाढ झाली आहे. सप्टेंबर महिन्यात जिल्ह्याची सरासरी पाणीपातळी ४.२९ मीटरवरून ३.०४ मीटरपर्यंत आली आहे. भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.
भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेमार्फत सातत्याने भूजल पातळीची नोंद घेतली जाते. त्यासाठी जिल्ह्यात १४१ निरीक्षण विहिरी निश्चित केलेल्या आहेत. दर तीन महिन्यांनी यातील पाणी पातळीची मोजणी केली जाते. सप्टेंबर महिन्यात सर्वच ठिकाणी पाणीपातळी वाढलेली आढळून आली. यंदा ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात सतत अतिवृष्टी झाली.
त्यामुळे बहुतांश विहिरी, बोरवेल आणि शेततळी पुन्हा पाण्याने भरली. पैठण, खुलताबाद, गंगापूर, कन्नड आणि सिल्लोड तालुक्यांत भूजलवाढ सर्वाधिक झाली आहे. काही भागांत १.५५ ते १.६५ मीटरपर्यंत पातळी वाढली आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी ही वाढ दिलासा देणारी ठरली आहे.
काही विहिरींमध्ये मागील पाच वर्षांच्या तुलनेत सर्वोच्च जलपातळी नोंदवली गेली. या वर्षी झालेल्या मुसळधार पावसामुळे टँकरची गरज भासणार नाही, उलट रब्बी हंगामासाठी पुरेसे पाणी उपलब्ध राहील, असा प्रशासनाचा अंदाज आहे. जिल्हा प्रशासनाने यंदाच्या पावसाळ्यानंतर तयार झालेली जलपातळी आदर्श स्थिती असल्याचे नमूद केले आहे. दरम्यान, चांगल्या पावसामुळे भूजल पुनर्भरण नैसर्गिकरीत्या सुधारले आहे.
अजूनही पाऊस सुरू असल्याने यामध्ये आणखी काही वाढ होण्याची शक्यता आहे. पुढील काही महिन्यांत ही वाढ शाश्वत ठेवण्यासाठी शेतकऱ्यांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन भूजल सर्वेक्षण यंत्रणेचे जीवन बेडवाल यांनी केले आहे.