पहिले पार्किंगची व्यवस्था करा; नंतरच गाड्या उचला File Photo
छत्रपती संभाजीनगर

पहिले पार्किंगची व्यवस्था करा; नंतरच गाड्या उचला

मनपाविरोधात वाहनधारकांचा संताप; कारवाई प्रोझोन-एमजीएमसमोरच

पुढारी वृत्तसेवा

Sambhajinagar First, arrange for parking facilities; only then tow the vehicles

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरात बेशिस्त वाहनधारकांना शिस्त लावण्यासाठी महापालिका प्रशासन नागरी मित्र पथकामार्फत मोहीम राबवित आहे. यात रस्त्याच्या कडेला व रस्त्यावर अस्तव्यस्त पद्धतीने उभी असलेली दुचाकी, चारचाकी वाहने उचलून नेण्यात येते. परंतु, शिस्तीत उभी असलेली वाहनेही उचलून नेली जात आहे. त्यामुळे वाहनधारकांतून संताप व्यक्त होत असून, अगोदर पार्किंगची व्यवस्था करा, नंतर उचलेगीरी करा, अशा शब्दांत नागरिकांतून रोष व्यक्त होत आहे. त्यासोबतच एमजीएम, प्रोझोन मॉल येथेच पथक कसे, या दोन आस्थापनांवरच एवढे प्रेम का, असे सवालही उपस्थित होत आहेत.

शहरात कोणती सुविधा कोणासाठी सुरू करायची आणि सार्वजनिक सांगून त्याचा लाभ कसा त्याच संस्था, आस्थापनांना द्यायचा हे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. सध्या बेशिस्त पार्किंग, बांधकाम परवानगी यासह इतर काही विभागातून अशाच प्रकारे विशेष लाभ देण्याचे प्रकार महापालिकेत सुरू असल्याची चर्चा आहे.

महापालिकेत माजी सैनिकांना कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देत प्रशासनाने त्यांच्याकडून वाहनांची उचलेगिरीचे काम सुरू केले आहे. पूर्वी ३० माजी सैनिकांनाच घेण्यात आले होते. मात्र आता त्यात वाढ करण्यात आली असून, या माजी सैनिकांमार्फतच शहरात वाहने उचलण्याचे काम केले जात आहे. ही मोहीम प्रामुख्याने रोशनगेट, किराडपुरा, आझाद चौक, कटकटगेट या भागातच राबविण्यात येते. शहरात सर्वाधिक वाहने ही औरंगपुरा, पैठणगेट, सिटी चौक, शहागंज या भागात अस्ताव्यस्त पद्धतीने उभ्या असतात. परंतु त्या उचलण्यासाठी पथक या भागात फिरकतच नाही.

महापालिकेने अगोदर शहराच्या विविध भागांत पार्किंगची व्यवस्था करून द्यावी. त्यानंतर वाहने उचलण्याची कारवाई करावी. हॉस्पिटल, मॉलमध्ये पार्किंग असूनही तेथे पैसे घेतात. महापालिकेने हेही बंद करावेत. कारवाई करून वाहनधारकांकडून वसुली करावी.
सुरेश वाकडे पाटील, प्रदेश सचिव, बुलंद छावा संघटना

दोन संस्थांनाच सेवा

महापालिकेने शहरभर बेशिस्त वाहने उचलण्याची मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहे. परंतु महापालिकेने नियुक्त केलेले माजी सैनिकांचे मित्र पथक केवळ एमजीएम रुग्णालय परिसर आणि प्रोझोन मॉल याच भागात मोहीम राबविताना दिसतात. या भागातूनच सर्वाधिक वाहने उचलण्यात येतात. त्यामुळे ही सुविधा या दोन संस्थांसाठीच आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.

गाड्यांची नोंद नाही

महापालिकेच्या पथकाने गाडी उचलल्यानंतर त्या गाडीचा नंबर आणि गाडी उचलून नेणाऱ्यांचा संपर्क नंबर जेथून गाडी उचलून नेली. तेथे लिहिणे आवश्यक आहे, परंतु तसे न करता महापालिकेचे हे पथक गाडी घेऊन रवाना होतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT