Crime News pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar Crime : पाचवीत शिकणाऱ्या चिमुकलीला विवस्त्र करून दिले सिगारेटचे चटके

पित्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा; अंगावर ओतले थंड पाणी अन् डोक्याचे कापले केस; मिसारवाडीतील संतापजनक प्रकार

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : पित्याने स्वतःच्या १० वर्षांच्या चिमुकलीला विवस्त्र करून तिच्या अंगावर थंड पाणी ओतून तिला सिगारेटचे चटके दिल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. मुलीच्या डोक्याच्या पाठीमागील केस कापून तिचा विनयभंग केला.

हा प्रकार रविवारी (दि.२५) रात्री २ ते ३ वाजेच्या दरम्यान मिसारवाडी भागात घडला. याप्रकरणी पीडित मुलीच्या २४ वर्षीय मोठ्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी पित्याविरुद्ध सिडको पोलिसात विनयभंग आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीनुसार, आरोपी पिता हा सिडको पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहतो. त्याला दोन मुले आणि एक मुलगी आहे. पीडित मुलगी १० वर्षांची असून ती पाचवीच्या वर्गात शिक्षण घेते. आरोपी पिता हा अत्यंत क्रूर स्वभावाचा असून मुलांनी त्याचे काही काम ऐकले नाही किंवा त्याच्या मनासारखे वागले नाही, तर तो मुलांना अमानुष पद्धतीने मारहाण करत असल्याची माहिती समोर आली आहे.

रविवारी (दि. २५) मध्यरात्री २ ते ३ वाजेच्या सुमारास आरोपीने स्वतःच्या १० वर्षांच्या मुलीचे कपडे जबरदस्तीने काढले. रात्रीच्या वेळी तिच्या अंगावर थंड पाणी टाकले आणि तिच्या हात-पायांना सिगारेटने चटके दिले. त्यानंतर त्याने मुलीच्या डोक्याच्या पाठीमागील केस कापून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून तिचा विनयभंग केला. या घटनेनंतर रविवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास पीडितेच्या मोठ्या भावाला त्याच्या काकांनी फोन करून सांगितले की, वडील आणि बहीण घरात दिसत नाहीत.

भावाने शोधाशोध सुरू केली असता, त्याला मावशीच्या मुलीचा फोन आला आणि तिने पीडित मुलगी तिथे आल्याचे सांगितले. मोठा भाऊ तत्काळ तिथे पोहोचला. तेव्हा बहीण त्याला पाहून प्रचंड रडू लागली. त्याने विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, घाबरलेल्या चिमुकलीने रात्री घडलेला प्रकार भावाला सांगितला. यानंतर भावाने थेट सिडको पोलिस ठाणे गाठून बापाविरुद्ध तक्रार दिली. आरोपीला पोलिसांनी अटक केली असून अधिक तपास उपनिरीक्षक सोपान नराळे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT