Kiranotsav Ellora Caves  Pudhari
छत्रपती संभाजीनगर

Kiranotsav Ellora Caves | वेरूळ लेणीत अद्भुत ‘किरणोत्सव’; बुद्धमूर्तीच्या चेहऱ्यावर पडली सूर्यकिरणांची सोनेरी छटा

मावळत्या सूर्याची किरणे झरोक्यातून थेट गर्भगृहात; देश-विदेशी पर्यटकांनी अनुभवला मनोहारी नजारा

पुढारी वृत्तसेवा

Verul Caves Buddha Statue

वेरूळ : जगप्रसिद्ध वेरूळ लेणी समूहातील लेणी क्रमांक १० अर्थात प्रसिद्ध विश्वकर्मा लेणी (सुतार झोपडी) येथे शनिवारी (दि. ३) अद्भुत ‘किरणोत्सव’ अनुभवायला मिळाला. दुपारनंतर मावळत्या सूर्याची सोनेरी किरणे लेणीसमोरील विशिष्ट झरोक्यातून थेट गर्भगृहात प्रवेश करत धम्मचक्र प्रवर्तन मुद्रेत विराजमान भगवान बुद्धांच्या मूर्तीच्या चेहऱ्यावर पडली. सूर्यकिरणांनी बुद्धमूर्तीचा चेहरा प्रकाशमान होताच लेणीच्या परिसरात विलक्षण तेज पसरल्याचा अनुभव पर्यटकांनी घेतला.

हा अनोखा नजारा पाहण्यासाठी दुपारपासूनच लेणी क्रमांक १० मध्ये देश-विदेशातील पर्यटकांची गर्दी झाली होती. सायंकाळी चारच्या सुमारास सूर्यकिरणे हळूहळू झरोक्यातून लेणीच्या आतील भागात प्रवेश करू लागली. काही क्षणांतच ही किरणे बुद्धमूर्तीच्या चेहऱ्यावर स्थिरावली. हा अद्भुत क्षण दिसताच उपस्थित पर्यटकांनी टाळ्यांचा कडकडाट करत आनंद व्यक्त केला. अनेकांनी मोबाईल कॅमेऱ्यांतून या क्षणाचे छायाचित्रण आणि व्हिडिओ शूटिंग केले.

स्थापत्यकला आणि खगोलीय स्थितीचा अनोखा संगम

ऑक्टोबर महिन्यात सूर्याच्या विशिष्ट स्थितीमुळे मावळत्या सूर्याची किरणे लेणीसमोरील नक्षीदार झरोक्यातून एका विशिष्ट कोनातून गर्भगृहात प्रवेश करतात. त्यानंतर काही काळ ही किरणे थेट भगवान बुद्धांच्या मूर्तीच्या चेहऱ्यावर पडतात. त्यामुळे मूर्तीचा चेहरा प्रकाशमान झाल्याचे मनोहारी दृश्य दिसते. प्राचीन स्थापत्यकलेचा आणि सूर्याच्या खगोलीय स्थितीचा हा अनोखा संगम पर्यटकांसाठी आकर्षणाचा विषय ठरतो.

किरणोत्सवाच्या वेळी पुरातत्त्व विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पर्यटकांना आवश्यक माहिती देत सहकार्य केले. दरवर्षी या वैशिष्ट्यपूर्ण घटनेचा अनुभव घेण्यासाठी अभ्यासक, छायाचित्रकार तसेच देश-विदेशातील पर्यटक वेरूळला भेट देतात.

शनिवारच्या किरणोत्सवामुळे वेरूळ लेणीच्या प्राचीन स्थापत्यवैभवाला निसर्गाच्या प्रकाशाची मनोहारी साथ लाभली. बुद्धमूर्तीच्या चेहऱ्यावर पडलेली सूर्यकिरणांची सोनेरी छटा पाहण्याचा अविस्मरणीय अनुभव पर्यटकांनी आपल्या कॅमेऱ्यांत आणि आठवणींत साठवून घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT