युद्धामुळे खाद्यतेलाच्या दरात १६ ते २० रुपयांची वाढ pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Chatrapati Sambhajinagar : युद्धामुळे खाद्यतेलाच्या दरात १६ ते २० रुपयांची वाढ

इराण आणि इस्रायल-अमेरिका युद्धामुळे देशात गॅस टंचाई निर्माण झाली असतानाच आता खाद्यतेल पुरवठाही विस्कळीत

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : मध्यपूर्वेत पेटलेल्या थेट परिणाम बाजारपेठेवर होत असून, युद्धामुळे गॅसची टंचाई झाली तशी खाद्यतेलाचा तुटवडा निर्माण होईल या भीतीपोटी मागणी वाढल्याने तेल दराचा भडका उडाला आहे. सूर्यफूल, सोयाबीन आणि सरकी रिफाईंडसह शेंगदाणा तेलाचे दर प्रतिलिटर १६ रुपये ते २० रुपये वाढल्याने सर्वसामान्यांच्या स्वयंपाक घरातील बजेट कोलमडले आहे. इराण आणि इस्रायल-अमेरिका युद्धामुळे देशात गॅस टंचाई निर्माण झाली असतानाच आता खाद्यतेल पुरवठाही विस्कळीत झाल्याचे तेल व्यावसायिकांकडून सांगितले जात आहे.

त्यात गुडीपाडवा, ईद आणि लग्नसराई यामुळे खाद्यतेलाची मागणी वाढली आहे. परिणामी सूर्यफूल, सोयीबीन आणि शेंगदाणा तेलांच्या दरातही वाढ झाली आहे. तीन दिवसांत खाद्यतेलाच्या प्रतिकिलो दरामध्ये साधारण १६ ते २० रुपयांची वाढ झाली आहे. सोयाबीन, सरकी आणि राईसन्ब्रान तेल प्रतीलिटर १४४ वरुन १६० रुपयांवर पोहचले आहे. तर सूर्यफूल प्रतीलिटर १८ रुपयांनी वाढून १८६ रुपये झाले आहे. शेंगदाणा तेल २१० रुपयांवरुन २३० रुपये प्रतीलिटरवर गेले आहेत.

याशिवाय सूर्यफूल आणि सोयाबीन तेलाचा १५ किलोचा डबा तब्बल दीडशे ते १८० रुपयांनी, तर शेंगदाणा तेलाचा १५ किलोचा डबा ३२५ रुपयांनी महागला आहे. नवीन माल आल्याने करडी तेलाचे भाव मात्र, प्रतीलिटर ३० रुपयांनी घसरुन ३०० रुपयांवर आले आहेत. जवळपास वर्षभरापासून खाद्यतेलाच्या किंमती स्थिर होत्या. मात्र, युद्धामुळे तुटवड्याची भिती, सणासुदी आणि लग्नसराईमुळे मागणी वाढल्याने तेलाचे दर पुन्हा वाढत आहेत.

66 युद्धामुळे खाद्यतेलाचे भाव वाढतील, याचा अंदाज होता, मात्र लिटरमागे २० रुपयांच्या दरवाढीने चटका बसला आहे. याचा महिन्याच्या बजेटवर परिणाम जाणवत आहे.
सुधा गाडेकर, गृहणी
युद्धामुळे गॅस टंचाईप्रमाणे खाद्यतेलाचा 66 पुरवठाही विस्कळीत होईल, ही भीती आणि सणासुदीसह लग्नसराईमुळे वाढलेली मागणी यामुळे खाद्यतेलाचे दर वाढले आहेत. सूर्यफूल, सोयाबीन, शेंगदाणा तेल भाव प्रतिलिटर १६ ते २० रुपयांनी वाढले आहे. खोबरा तेलही ४०० वरून ४४० रुपये झाले आहे.
किशोर मिटकर, खाद्यतेल व्यापारी,

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT