श्री स्वामी नरेंद्र अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar Fraud Case : तरुणाची १० लाखांची एफडी हडपली

१३.५० टक्के व्याजाचे आमिष : श्री स्वामी नरेंद्र अर्बनच्या अध्यक्ष, व्यवस्थापकावर गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : गावाकडील प्लॉट विकून आलेली कष्टाची पुंजी सुरक्षित राहावी आणि भविष्यासाठी चांगला परतावा मिळावा म्हणून पतसंस्थेत ठेवलेली १० लाख रुपयांची एफडी (मुदत ठेव) हडप करून एका तरुणाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.

उस्मानपुरा परिसरातील दशमेश नगर येथे कार्यरत असलेल्या श्री स्वामी नरेंद्र अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या अध्यक्षासह व्यवस्थापकाने तब्बल १३.५० टक्के व्याजाचे आमिष दाखवून ही रक्कम गुंतवून घेतली. मात्र, मुदत संपल्यानंतर मूळ रक्कम परत न करता वारंवार नवीन एफडीचे कागदपत्र देऊन वेळ मारून नेली आणि अखेर हात वर केले.

याप्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात पतसंस्थेचे अध्यक्ष संजय दामोदर म्हस्के (रा. कन्नोरी, ता. फुलंब्री) आणि व्यवस्थापक संदीप संजय खरात (रा. कोसगाव, जालना) या दोघांविरुद्ध एमपीआयडी आणि बीएनएसच्या विविध कलमांनुसार शुक्रवारी (दि.२३) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी अभिजीत सुरेशराव वाघमारे (रा. हर्सूल ) यांच्या तक्रारीनुसार, त्यांनी २०२२ मध्ये गावाकडील स्वतःचा प्लॉट २४ लाख ३० हजार रुपयांना विकला होता. या रकमेतील सुरक्षित बचतीसाठी त्यांनी १ फेब्रुवारी २०२३ रोजी दशमेश नगर, उस्मानपुरा येथील श्री स्वामी नरेंद्र अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडमध्ये १० लाख रुपयांची एफडी केली. त्यामध्ये ३ लाख रुपये १३ टक्के व्याजदराने १३ महिन्यांसाठी, तर ७ लाख रुपये १३.५० टक्के व्याजदराने १३ महिन्यांसाठी ठेवण्यात आले होते.

१ मार्च २०२४ रोजी या दोन्ही मुदत ठेवींची मुदत पूर्ण झाली. वाघमारे हे आपली मूळ रक्कम घेण्यासाठी गेले असता, पतसंस्थेचे अध्यक्ष संजय म्हस्के आणि व्यवस्थापक संदीप खरात यांनी त्यांना केवळ व्याजाची रक्कम दिली. आम्हाला थोडा वेळ द्या, काही महिन्यांत तुमचे पैसे परत करू, असे सांगून १० लाख रुपयांची मूळ मुद्दल देण्यास थेट नकार दिला.

४ मार्च २०२४ रोजी पुन्हा वाघमारे यांच्या नावे १ लाख रुपयांच्या ५ मुदत ठेवी १२ महिन्यांसाठी (११.५% व्याज आणि १ लाख रुपयांच्या ५ मुदत ठेवी ६ महिन्यांसाठी (८% व्याज) अशा स्वरूपात ठेवींचे नूतनीकरण करण्यात आले या ठेवी ३१ ऑगस्ट २०२४ आणि ४ मार्च २०२५ रोजी मॅच्युअर झाल्यावरही अध्यक्ष व व्यवस्थापकाने पुन्हा मूळ रक्कम देण्यास नकार देत केवळ व्याज हातात टेकवले त्यानंतर १ जानेवारी २०२५ व ४ मार्च २०२५ रोजी पुन्हा ५-५ लाख रुपयांच्या दोन मुदत ठेवी १३ महिन्यांसाठी १३ टक्वे व्याजाने करण्यात आल्या. या ठेवींचे एप्रिल २०२५ पर्यंतचे व्याज वाघमारे यांना मिळाले. मात्र त्यानंतर पतसंस्थेने व्याज देणेही पूर्णपणे बंद करून टाकले.

  • २०२३ ते २०२५ या दोन वर्षाच्या कालावधीत वाघमारे यांनी वारंवार फेऱ्या मारूनही पतसंस्थेच्या अध्यक्षांनी व व्यवस्थापकाने त्यांची १० लाख रुपयांची मूळ रक्कम परत न करता त्यांची थेट फसवणूक केली. गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक मुदिराज यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक किरण बोराडे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT