१८ वर्षीय तरुणीला हायवा चालकाने चिरडले file photo
छत्रपती संभाजीनगर

१८ वर्षीय तरुणीला हायवा चालकाने चिरडले

बुधवारी (दि.१८) सकाळी उपचारादरम्यान तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.

पुढारी वृत्तसेवा

Sambhajinagar 18-year-old girl crushed in accident

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा:

डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगून नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या १८ वर्षीय तरुणीचा बेजबाबदार हायवा चालकाने आणि महापारेषणच्या निष्काळजी कंत्राटदारामुळे बळी गेला. हिरापूर रस्त्यावर बजरंगनगर भागात मंगळवारी (दि.१८) सकाळी ११ वाजेच्या सुमारास मनस्वी विजय गाडगे या तरुणीला अवजड हायवाने चिरडून गंभीर जखमी केले.

बुधवारी (दि.१८) सकाळी उपचारादरम्यान तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच संतप्त नातेवाईक, रहिवाशांनी चिकलठाणा पोलिस ठाण्यात ठिय्या दिला. अखेर महापारेषण कंपनी आणि हायवा चालकावर गुन्हा दाखल केल्यानंतरच जमाव शांत झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनस्वीचे वडील गेल्या काही दिवसांपासून आजारी असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मंगळवारी सकाळी मनस्वी, तिची धाकटी बहीण गारवी आणि आई रंजना गाडगे हे तिघेही दुचाकीवरून गारवीला शाळेत सोडवण्यासाठी निघाले होते. वाटेत आईला चक्कर आल्याने त्यांनी गाडी बाजूला उभी केली.

त्याच भागात रस्त्यालगत महापारेषण कंपनीचा एक ओव्हरलोड हायवा (एमएच-२०-ईएल-०९००) समोरून येणाऱ्या बसला जागा करून देण्यासाठी अचानक वेगात मागे आला. चालकाने मागे न पाहता हायवा रिव्हर्स घेतल्याने उभ्या असलेल्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत आई रंजना बाजूला फेकल्या गेल्या, मात्र मनस्वी हायवाच्या चाकाखाली आल्याने गंभीर जखमी झाली. तिला जवळील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केल्यावर पुढील उपचारासाठी तिला घाटीत नेण्यात आले होते. मात्र तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

डॉक्टर होण्याचे स्वप्न अधुरेच

मनस्वीने नुकतीच बारावी सायन्सची परीक्षा दिली होती. ती अत्यंत हुशार होती. सध्या ती नीट-सीईटी परीक्षेची तयारी करत होती. आपल्या कुटुंबाची परिस्थिती सुधारण्याचे आणि डॉक्टर होण्याचे तिचे स्वप्न होते. मात्र प्रशा-सणाया ढिसाळ कारभारामुळे एका उच्चशिक्षित होऊ पाहणाऱ्या तरुणीचा बळी गेला असल्याचा संताप स्थानिकांनी व्यक्त केला.

हायवाचा नंबर खोडलेला

बजरंगनगर भागात हिरापूर रस्त्यालगत महापारेषण कंपनीच्या एक्सटेंशन लाईनचे काम सुरू आहे. मात्र कंत्राटदाराने कोणतीही सुरक्षा यंत्रणा लावली नव्हती. याच हलगर्जीपणामुळे मनस्वीचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. अपघात घडला तरी पोलिसांना वाहनाचा नंबर कळू नये यासाठी हायवाचा नंबर खोडण्यात आलेला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT