Jayakwadi Dam Godavari Water Discharge
पैठण : मराठवाड्याची जीवनदायिनी असलेल्या जायकवाडी धरणाने अखेर पूर्ण क्षमतेचा टप्पा गाठल्यानंतर मंगळवारी (दि. ४) सायंकाळी ६.११ वाजता धरणाचे १८ दरवाजे अर्धा फूट उघडून गोदावरी नदीपात्रात १० हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. जायकवाडी धरणाच्या इतिहासात दरवाजे उघडण्याची ही १७ वी वेळ असून सलग चौथ्या वर्षी धरणातून पाणी सोडण्याची वेळ आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून नाशिक, अहिल्यानगर तसेच जायकवाडीच्या विस्तीर्ण पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरू होती. त्यामुळे धरण अल्पावधीतच पूर्ण क्षमतेने भरल्याने जलसंपदा विभागाने नियंत्रित स्वरूपात पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय घेतला.
कार्यकारी संचालक (गोदावरी विकास महामंडळ) जयंत गवळी, नामदेवराव खराद, कार्यकारी अभियंता गणेश हसे आणि राजेंद्र धोडपकर यांच्या हस्ते विधीवत पूजन करून धरणाचे दरवाजे उघडण्यात आले. यावेळी उपविभागीय अभियंता श्रद्धा निंबाळकर, धरण अभियंता तंत्रज्ञ गणेश खराडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील, पोलीस निरीक्षक महादेव गोमारे यांच्यासह जलसंपदा विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
धरणाचे १० ते २७ क्रमांकाचे एकूण १८ दरवाजे प्रत्येकी अर्धा फूट उचलण्यात आले असून प्रत्येक दरवाजातून सुमारे ५२० क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे गोदावरी नदीपात्रात एकूण १० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. विसर्ग सुरू करण्यापूर्वी धरण परिसरातील सर्व यंत्रणेची तपासणी करण्यात आली तसेच नदीपात्रात पाणी सोडण्यापूर्वी इशारा देणारा सायरनही वाजविण्यात आला.
मंगळवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंतच्या नोंदीनुसार धरणात ९१.६२ टक्के जिवंत पाणीसाठा उपलब्ध होता. धरणाची पाणीपातळी १५२०.४६ फूट (४६३.४३६ मीटर) इतकी नोंदविण्यात आली. त्याचवेळी धरणात ४३ हजार ३०१ क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू होती. उजव्या कालव्यातून १ हजार क्युसेक, तर डाव्या कालव्यातून ७०० क्युसेक असा एकूण १ हजार ७०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. वाढत्या आवकेमुळे धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने अखेर दरवाजे उघडण्याचा निर्णय घेण्यात आला.
यंदाच्या पावसाळ्यात जायकवाडी धरण अपेक्षेपेक्षा लवकर भरल्याने मराठवाड्याच्या पिण्याच्या पाण्याची, सिंचनाची आणि औद्योगिक वापराची मोठी चिंता दूर झाली आहे. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
दरम्यान, धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येत असल्याने गोदावरी नदीतील पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी नदीपात्रात जाणे टाळावे, जनावरे व साहित्य सुरक्षित स्थळी हलवावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, तहसीलदार ज्योती पवार आणि जायकवाडी धरण प्रशासनाने केले आहे.
जायकवाडी धरणाचे दरवाजे आतापर्यंत इतिहासात १७ वेळा उघडण्यात आले आहेत. विशेष म्हणजे सलग चौथ्या वर्षी धरण पूर्ण क्षमतेने भरून गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग करण्याची वेळ आली आहे.