Saibaba Mahila Patsanstha Scam Chhatrapati Sambhajinagar Finance Fraud
वैजापूर : जास्त व्याज देण्याचे आमिष दाखवून यापूर्वी जिल्ह्यात चार ते पाच पतसंस्थांनी ठेवीदारांची फसवणूक केली होती. आता साईबाबा महिला नागरी सहकारी पतसंस्थेची वैजापूर शाखेत कोटयवधींची आर्थिक गुंतवणूक करणाऱ्या शेकडो ग्राहकांची फसवणूक झाली आहे. संस्थेचे चेअरमन व संचालक मंडळ आर्थिक घोटाळा करुन गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
फसवणूक झालेल्या शेकडो ग्राहकांनी आमदार रमेश बोरनारे यांच्या नेतृत्वाखालील सोमवारी (दि.१९) वैजापूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन संबंधितांवर गुन्हे दाखल करुन त्यांच्याकडून आर्थिक रक्कम वसूल करण्याची मागणी केली. दरम्यान या प्रकरणात आर्थिक फसवणूक झालेल्या ग्राहकांची एकूण किती कोटींची फसवणूक झाली यासाठी पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे यांनी महिती संकलित करण्यास सुरुवात केली आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे समर्थनगर परिसरातील साईबाबा महिला नागरी सहकारी पतसंस्थेची वैजापूर शहरात म्हसोबा चौक परिसरातील शाखेतील आर्थिक व्यवहार बंद करण्यात आला. आठवडाभराचा कालावधी संपल्यानंतर पतसंस्था कामकाज बंद असल्याचे लक्षात आल्यानंतर ग्राहकांनी बँकेचे चेअरमन व संचालकांशी संपर्क साधला. मात्र, प्रतिसाद मिळत नसल्याने हादरलेल्या शेकडो ग्राहकांना आमदार रमेश बोरनारे यांची भेट घेऊन त्यांना आर्थिक फसवणूक झाल्याचे सांगितले.
सर्व ग्राहकांना सोबत घेऊन आ. बोरनारे यांनी ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या साईबाबा महिला नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमनसह संचालक मंडळाचा पोलीसानी शोध घेऊन ठेवीदारांची फसवणूक करणाऱ्या त्या त्या रक्कमेतून कुठे मालमत्ता खरेदी केली ती जप्त करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या.