छत्रपती संभाजीनगर : राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी जाहीर करावी, या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने सोमवारी (दि. २९) संभाजीनगरातील केंब्रिज चौकात सुमारे दीड तास रास्ता रोको आंदोलन केले. आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनामुळे संभाजीनगर ते जालना रोडवरची वाहतूक चार तास ठप्प झाली होती. आंदोलनादरम्यान, पोलिसांनी खासदार सुप्रिया सुळे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह नेत्यांना ताब्यात घेतल्यानंतर वातावरण चांगलेच तापले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने सोमवारी सरसकट कर्जमाफीसाठी केंब्रिज चौकात सुमारे दीड तास चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात खा. सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, हर्षवर्धन सपकाळ, खा. नीलेश लंके, खा. डॉ. कल्याण काळे, खा. बजरंग सोनवणे, माजी मंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री राजेश टोपे, आ. संदीप क्षीरसागर, यांच्यासह शेतकरी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
आंदोलन सुरू असतानाच मंत्री गिरीश महाजन यांनी आ. रोहित पवार यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून मुख्यमंत्री हे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यास तयार असल्याचा निरोप दिला. आज मंगळवारी (दि.३०) सकाळी सरकारसोबत बैठक होणार असल्याचे सांगण्यात आले. उद्याच्या बैठकीत कर्जमाफीबाबत ठोस निर्णय झाला नाही किंवा सरकारने पुन्हा शब्द फिरवला, तर विदर्भातून यापेक्षाही मोठे आंदोलन उभारले जाईल, असा इशारा आ. रोहित पवार यांनी दिला.
पोलिसांच्या वाहनांवर चढून निषेध
खा. सुप्रिया सुळे यांच्यासह अन्य नेत्यांना पोलिसांनी बळजबरीने ताब्यात घेतल्यानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या वाहनावर चढून निषेध व्यक्त केला. जोरदार घोषणाबाजीमुळे काही काळ केंब्रिज चौक परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.