छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिका निवडणुकीसाठी सुरू असलेली प्रभाग रचना प्रक्रिया आता निर्णायक टप्प्यात पोहोचली आहे. नागरिकांकडून प्राप्त झालेल्या आक्षेप-सूचना तपासून त्यावर सुनावणी घेतल्यानंतर महापालिकेने आवश्यक त्या दुरुस्त्या करून गुरुवारी (दि.१८) सुधारित प्रभाग रचनेचा अहवाल मुंबईतील नगरविकास विभागाकडे सादर केला. शासन या अहवालाची छाननी करून निवडणूक आयोगाला सादर करणार असून, त्यानंतर अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या हालचालींना वेग आला आहे.
महापालिकेच्या रखडलेल्या निवडणुका तातडीने घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर शासन व निवडणूक आयोगाने कामाला वेग दिला. या अनुषंगाने महापालिकेने चार नगरसेवकांचा एक असा २८ प्रभाग आणि तीन नगरसेवकांचा एक असा मिळून २९ प्रभागांचा प्रारूप आराखडा तयार करून नगरविकास विभागाकडे सादर केला होता. त्यानंतर २२ ऑगस्ट रोजी महापालिकेने प्रभागनिहाय नकाशे व हद्दी संकेतस्थळावर प्रसिद्ध केले. २३ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या कालावधीत नागरिकांकडून आक्षेप व सूचना मागवण्यात आल्या. या कालावधीत तब्बल ५५२ आक्षेप दाखल झाले. हद्दीतील तफावत, नकाशांतील विसंगती, काही प्रभागांचा अतिरेक लांबीसारखे मुद्दे प्रमुख होते.
या आक्षेपांवरील सुनावणी पूर्ण झाल्यानंतर प्रशासक जी. श्रीकांत यांच्या आदेशानुसार १० टीमकडून स्वतंत्र पडताळणी करून अहवाल तयार करण्यात आला. त्यानुसार काही प्रभागांच्या मर्यादांमध्ये दुरुस्ती करून अंतिम सुधारित आराखडा निश्चित करण्यात आला. त्यानंतर गुरुवारी महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी मुंबईत जाऊन हा अहवाल नगरविकास विभागाला सादर केला असून, यानंतर अंतिम प्रभाग रचना प्रसिध्द होणार असल्याची माहिती विश्वासनीय सूत्रांनी दिली आहे.
अंतिम प्रभाग रचना निश्चित झाल्यानंतर निवडणूक आयोगाकडून पुढील प्रक्रिया गतीने राबवली जाणार *** आहे. त्यामुळे शहरातील राजकीय वातावरण आणखी तापणार असून, पक्षीय हालचालींनाही वेग येण्याची चिन्हे दिसत आहेत.
आता शासन या अहवालाची तपासणी करून निवडणूक आयोगाला सादर करणार आहे. आयोगाकडून मंजुरी मिळाल्यानंतरच अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध होईल. त्यानंतर आरक्षण सोडत काढली जाईल. कोणत्या प्रभागात महिला, मागासवर्गीय व अनुसूचित जाती-जमातींसाठी जागा आरक्षित होणार याकडे नागरिक, पक्ष आणि संभाव्य उमेदवारांचे लक्ष लागले आहे.