Chhatrapati Sambhajinagar Fraud Case pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar Fraud Case : माजी सैनिकाला घातला पावणेदोन कोटींचा गंडा

कोल्हापूरच्या ए टू झेड कंपनीच्या संचालकांसह पाच जणांवर गुन्हा; सीएचाही सहभाग

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : ड्रोन आणि आयएफडी पॅनेल निर्मिती करणाऱ्या कंपनीत गुंतवणुकीवर दरमहा १५ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून एका निवृत्त जवानाची तब्बल २ कोटी ३७ लाख ७८ हजार ५५० रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कोल्हापूर येथील कंपनीच्या संचालकांसह पाच जणांविरुद्ध मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, यात एका चार्टर्ड अकाऊंटंटचा (सीए) समावेश आहे.

जलील नुरुद्दीन किरनगी, सचिन सीताराम ढेपले, वैभव खामकर, शिल्पा सुशांत फडणीस आणि सीए सुशांत शरदचंद्र फडणीस (सर्व रा. कोल्हापूर) अशी आरोपींची नावे आहेत. सेवानिवृत्त सुभेदार किशोर देवसिंग बरंडवाल (५४) यांच्या तक्रारीनुसार, २०२१ मध्ये एका मित्राच्या सांगण्यावरून बरंडवाल यांनी कोल्हापूरच्या ए टू झेड कंपनीत जाऊन आरोपींची भेट घेतली.

त्यावेळी आरोपींनी ड्रोन व्यवसायात मोठी मागणी असल्याचे सांगत गुंतवणुकीवर १५ टक्के हमखास परताव्याचे लेखी आमिष दाखवले. सीए सुशांत फडणीस यानेही गुंतवणूक सुरक्षित असल्याचा खोटा विश्वास दिला.

यानंतर बरंडवाल यांनी मुदतपूर्व एफडी मोडून २९ लाख रुपये आणि नातेवाईक पवनकुमार पवार यांच्यासोबत शुभ-फिनो डेव्हलपमेंट कंपनी स्थापन करून इतर गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये आरोपींच्या खात्यात वर्ग केले.

बँक टेक-ओव्हरची थाप

सुरुवातीला काही परतावा दिल्यानंतर आरोपींनी पैसे देणे बंद केले. पैशांची मागणी केली असता, आरोपींनी मुंबईतील शालिनी सहकारी बँक टेक-ओव्हर करत असल्याची थाप मारून ५५ लाख ८० हजारांच्या शेअर्सची मागणी केली. तसेच आरोपींनी तडजोडीपोटी दिलेले लाखो रुपयांचे चेक बँकेत बाऊन्स झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर अखेर बरंडवाल यांनी पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक प्रशांत पासलकर करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT