छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या अगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी (दि. २७) जाहीर केला आहे. त्यासंर्भातील पत्र महापालिकेला प्राप्त झाले आहे. त्यानुसार येत्या ८ नोव्हेंबर रोजी आरक्षणाची जाहीर सूचना प्रसिद्ध केली जाणार असून त्यानंतर ११ नोव्हेंबर रोजी आरक्षण सोडत घेण्यात येणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार छत्रपती संभाजीनगर महापालिकेने निवडणुकीसाठी प्रभाग रचना तयार करून ती अंतिम करण्यासाठी आयोगाला सादर केली होती. ही प्रभाग रचना अंतिम झाल्यानंतर आयोगाच्या आदेशाने महापालिकेकडून मतदार याद्यांचे पुनर्रिक्षण करण्यात येत आहे.
मतदार यादी अंतिम करून त्या येत्या ६ नोव्हेंबरपर्यंत प्रसिद्ध केल्या जाणार आहे. त्यापाठोपाठ आता प्रभाग रचनेच्या आरक्षणाचा कार्यक्रम देखील राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. आयोगाच्या या आदेशानुसार येत्या ३० ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर दरम्यान प्रभागातील आरक्षित जागांची संख्या निश्चित करण्यात येणार आहे. या जागा निश्चित केल्यानंतर तो प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात यावा, असे कार्यक्रमात नमूद केले आहे.
असा आहे सोडतीचा कार्यक्रम
आयोगाने आरक्षित जागांच्या संख्येला मंजुरी दिल्यानंतर ८ नोव्हेंबर रोजी आरक्षण सोडतीची जाहीर सूचना वृत्तपत्रात प्रसिद्ध करणे,
११ नोव्हेंबर रोजी आरक्षणाची सोडत काढून सोडतीचा निकाल राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेसाठी सादर करणे,
१७ नोव्हेंबर रोजी प्रारूप आरक्षण, हरकती व सूचना मागविण्यासाठी विहित नमुन्यात प्रसिद्ध करणे,
२४ नोव्हेंबर रोजी प्रारूप आरक्षण हरकती व सूचना मागविण्याचा अंतिम दिनांक,
२५ नोव्हेंबर ते १ डिसेंबर रोजी प्रारूप आरक्षणावर प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर विचार करून संबंधित मनपा आयुक्त यांनी आदेशाच्या परिशिष्ट-११ मधील नमुन्यात निर्णय घेणे,
२ डिसेंबर रोजी आयोगाच्या मान्यतेनंतर अंतिम आरक्षण विहित नमुन्यात शासन राजपत्रात प्रसिद्ध करणे.