Repair work on the leaking slab of the new pump house has begun
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहराच्या २७४० कोटींच्या नवीन पाणीपुरवठा योजनेतील नक्षत्रवाडी पंपहाऊसच्या स्लॅबला पहिल्याच पावसात लागलेली गळती दोन दिवसांत दुरुस्त करून पाणीपुरवठा पूर्ववत सुरू केला जाईल, अशी ग्वाही अधिकाऱ्यांनी रविवारी (दि. २८) दिली. या गळतीमुळे विद्युत पॅनेलला धोका निर्माण झाल्याने शहराचा ४० एमएलडी वाढीव पाणीपुरवठा १५ दिवसांतच बंद करण्याची वेळ आली होती.
हा प्रकार समोर येताच मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी घटनास्थळी धाव घेत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (एमजेपी) आणि कंत्राटदार 'जीव्हीपीआर' कंपनीच्या अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली.
त्यांनी दोन दिवसांत दुरुस्ती पूर्ण करण्याचे कडक आदेश दिले. कंत्राटदाराने इमारतीचे निकृष्ट बांधकाम तर केलेच, शिवाय वॉटरप्रूफिंग न करताच पंपगृहाचा वापर सुरू केल्याचे उघड झाले आहे. या निष्काळजीपणामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आता संपूर्ण योजनेच्या कामावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
सध्या स्लॅबच्या वॉटरप्रूफिंगचे काम युद्धपातळीवर सुरू असून, विद्युत यंत्रणेची तज्ज्ञांमार्फत बारकाईने तपासणी केली जात आहे. कंत्राटदार कंपनीच्या या निष्काळजीपणामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आता संपूर्ण पाणीपुरवठा योजनेच्या कामाच्या दर्जावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.