Redress complaints regarding birth and death certificates: Mayor
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरातील नागरिकांना जन्म व मृत्यू दाखले मिळविताना येणाऱ्या अडचणींच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यात यावे, असे स्पष्ट निर्देश महापौर समीर राजुरकर यांनी मंगळवारी (दि.१०) आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत दिले. या सेवा अधिक पारदर्शक, सुलभआणि जलद करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तातडीने करण्याचेही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले.
महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत जन्म व मृत्यू नोंदणीचे काम केले जाते. मात्र काही वेळा दाखले मिळण्यास होणारा विलंब, कागदपत्रांची पूर्तता, नोंदीतील त्रुटी तसेच ऑनलाईन प्रक्रियेमधील अडचणी याबाबत नागरिकांकडून मनपाकडे तक्रारी प्राप्त होत असल्याचे मंगळवारी आरोग्य विभागाच्या बैठकीत निदर्शनास आले.
या पार्श्वभूमीवर नागरिकांना वेळेत आणि अचूक सेवा मिळणे अत्यंत आवश्यक असल्याचे महापौर समीर राजूरकर यांनी स्पष्ट केले. जन्म व मृत्यू दाखल्यांशी संबंधित प्रकरणे प्रलंबित राहू नयेत. प्रत्येक अर्जाची तातडीने छाननी करून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर दाखले लवकरात लवकर देण्यात यावेत.
तसेच नागरिकांना कार्यालयीन प्रक्रियेची अचूक माहिती मिळावी. नागरिकांना वारंवार कार्यालयात फेऱ्या माराव्या लागू नयेत, असेही राजुरकर यांनी सांगितले. दरम्यान, आरोग्य विभागाच्या कामकाजाचा आढावा घेताना यावेळी नागरिकांच्या दैनंदिन गरजांशी संबंधित सेवा अधिक वेगवान आणि सुटसुटीत करण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करण्याची गरज असल्याचेही बैठकीत त्यांनी सांगितले.
जबाबदारीने कामे करा
मनपाच्या संबधित विभागातील कर्मचाऱ्यांनी नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी जबाबदारीने कामे करत सेवा अधिक पारदर्शक व विश्वासार्ह बनेल याकडे लक्ष देण्याच्या सूचना बैठकीत विविध सेवांच्या अंमलबजावणी बाबत त्यांनी माहिती घेतली.